दिलबहार पराभूत, झुंजार क्लब प्रथमच उपांत्य फेरीत
schedule27 Mar 23 person by visibility 241 categoryक्रीडा
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर :
बलाढ्य दिलबहार तालीम मंडळावर झुंजार क्लबने टायब्रेकरमध्ये ४-३ विजय मिळवत राजेश चषक फुटबॉल स्पर्धेत खळबळजनक विजयाची नोंद केली. पूर्णवेळेत सामना १-१ असा बरोबरीत होता. आजच्या विजयाचे झुंजार क्लब प्रथमच उपांत्य फेरीत दाखल झाला आहे. संयुक्त् जुना बुधवार पेठ सेवाभावी संस्था आयोजित ही स्पर्धा शाहू स्टेडियमवर खेळविली जात आहे.
आज झालेल्या सामन्यात झुंजार क्लबने कडवी लढत देत दिलबहाराचे मोठे आव्हान मोडीत काढले. पूर्वार्धात झुंजारने दिलबहार रोखण्यात यश मिळविले. त्यामुळे सामना शून्य गोलबरोबरीत होता. उत्तरार्धात झुंजारने गोल नोंदवत खळबळ माजविली. ४५ व्या मिनिटाला सुयश साळोखेने गोल केला. पण झुंजारचे समाधान फार काळ टिकले नाही. ४८ व्या मिनिटाला दिलबहारच्या स्वयंम साळोखेने गोल करत सामना १-१ असा बरोबरीत आणला. पूर्णवेळेत दोन्ही संघ आघाडी मिळवू न शकल्याने मुख्य पंचांनी टायब्रेकरचा अवलंब केला. झुंजारकडून मसूद मुल्ला, सुयश साळोखे, सूर्यप्रकाश सासने, यशराज नलवडे यांनी अचूक पेनल्टी कीक मारल्या. दिलबहारकडून पवन माळी, सचिन पाटील, सनी सनगर यांनी पेनल्टी मारण्यात यश मिळविले. स्वयंम साळोखेची किक गोलखांबाला तटली तर सुमीत घाटगेची पेनल्टी कीक वाया गेली. झुंजार क्लबच्या अनिल जानकर याची उत्कृष्ट खेळाडू म्हणून तर रोहन दाभोळकर याची लढवय्या खेळाडू म्हणून निवड झाली.
मंगळवारचा सामना,
शिवाजी तरुण मंडळ वि. जुना बुधवार पेठ, दुपारी ४ वा.