कृषी विभागाला भ्रष्टाचाराची कीड, लाच घेताना कृषी अधिकाऱ्याला अटक
schedule28 Nov 23 person by visibility 2543 categoryगुन्हे
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :
कृषी सेवा दुकान सुरू करण्यासाठी नऊ हजार रुपयांची लाच घेताना कसबा बावडा येथील जिल्हा कृषी कार्यालयातील कृषी अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. कृषी अधिकारी सुनील जगन्नाथ जाधव ( वय ५० वर्षे, वर्ग - २, सद्या रा.इंद्रजित कॉलनी, फ्लॅट क्रमांक ४०५ गंगाधाम अपार्टमेंट, जाधववाडी कोल्हापूर) असे लाच घेणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव आहे. जाधव हे मूळचे सातारा येथील अंजली कॉलनी शाहूपुरी येथील आहेत.
पोलिसांनी या कारवाईची माहिती दिली. तक्रारदार हे जैविक शेती तसेच सेंद्रिय शेती करण्याबाबत शेतकरी लोकांना मार्गदर्शन करत असतात. शेतकऱ्यांना लागणारे खत,बी बियाणे आणि कीटकनाशके यांची विक्री करण्याकरिता तक्रारदारांना स्वत:चे दुकान चालू करावयाचे होते. त्याकरीता आवश्यक असलेला परवाना मिळण्याकरिता तक्रारदाराने जिल्हा कॄषी कार्यालयाकडे ऑनलाईन तसेच ऑफ लाइन अर्ज केला होता . तक्रारदारांचा अर्ज मंजूर करून पुढील कार्यवाही करून वरिष्ठांच्याकडे पाठविणेसाठी कृषी अधिकारी जाधव याने तक्रारदाराकडे दहा हजार रुपयांची लाच मागितली. लाचेच्या रकमेत तडजोड करण्यात आली आणि दहा हजार रुपये ऐवजी नऊ हजार रुपयांची लाच कृषी अधिकारी जाधव यांनी मागितली. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे कृषी अधिकाऱ्यांच्या विरोधात तक्रार केली. या तक्रारीची खातरजमा करून पोलिसांनी सापळा रचला. तक्रारदाराकडून नऊ हजार रुपयांची लाच स्वीकारत असताना पोलिसांनी कृषी अधिकारी जाधव याला पकडले. त्याच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची काम सुरू झाले आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप अधीक्षक सरदार नाळे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक आसमा मुल्ला, पोलीस उपनिरीक्षक संजीव बंबरगेकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल अजय चव्हाण, विकास माने, पोलीस नाईक सचिन पाटील, सुधीर पाटील,विष्णू गुरव यांनी कारवाईत भाग घेतला.