पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला नागरिकांची साथ, जिल्ह्यात तीन लाख मूर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन
schedule24 Sep 23 person by visibility 465 categoryआरोग्य

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला कोल्हापूर जिल्ह्यात नागरिकांची साथ लाभली. नागरिकांच्या प्रतिसादामुळे जिल्ह्यात साडेतीन लाखाहून अधिक गणेश मूर्तीचे पर्यावरणपूर्वक विसर्जन झाले. महानगरपालिकेच्या यंत्रणेने शहरात १८० ठिकाणी उभारलेल्या कुत्रिम कुंडात ५३ हजार ४६० मूर्ती संकलित करुन त्या विधीवत इराणि खणीत विसर्जन केल्या. तर जिल्हा परिषदेने दोन लाख ८० हजार मूर्ती संकलित केल्या. महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेने राबवलेल्या उपक्रमामुळे आणि भाविकांनी दिलेल्या प्रतिसादामुळे पंचगंगा प्रदूषण मुक्ती चळवळीला यंदाही बळ मिळाले आहे.
दरम्यान दरवर्षी प्रमाणे यंदाही जिल्हा परिषद, कोल्हापूर अंतर्गत पर्यावरणपूरक गणेशोत्सव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमामध्ये ग्रामस्थांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला असून या उपक्रमांतर्गत तब्बल२,८०,०५१ मूर्ती संकलन तर सुमारे ५३८ टन इतके निर्माल्य संकलन केले. पंचगंगा प्रदूषणमुक्ती तसेच जिल्हयातील जलस्त्रोत प्रदूषणमुक्त ठेवण्याच्या हेतूने वर्ष२०१५ पासून हा उपक्रम सुरू करण्यात आला असून या वर्षी ही जिल्हयातील सर्व गावांनी यामध्ये सहभाग घेवून उपक्रम यशस्वी केला.
या उपक्रमामध्ये जिल्हयातील सर्व ग्राम पंचायतींनी सहभागी होवून जलस्त्रोत प्रदूषण मुक्त ठेवणेबाबतचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी केले होते.
हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोली ग्रामपंचायत येथे पर्यावरणपूरक गणेशोत्सव उपक्रमांत जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. प्रशासक संतोष पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव, जलजीवन मिशनच्या प्रकल्प संचालक माधुरी परीट, गटविकास अधिकारी शबाना मोकाशी यांनी मूर्ती संकलित केल्या.
महापालिकेर्ते शहरात ठिकठिकाणी कृत्रिम कुंडाची सोय केली होती. पंचगंगा नदी तसेच शहर परिसरातील तलावांचे प्रदूषण होऊ नये म्हणून शहरात १८० ठिकाणी विसर्जन कुंडाची पर्यायी व्यवस्था केली होती. या व्यतिरिक्त सार्वजनिक मंडळांनी, तालमींनी व संस्थांनीही काहीली, कृत्रिम विसर्जन कुंड ठेवले होते. प्रशासक के.मंजूलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, केशव जाधव, उप-आयुक्त साधना पाटील, शिल्पा दरेकर, सहा.आयुक्त संजय सरनाईक, डॉ.विजय पाटील, मुख्य व लेखा वित्त अधिकारी सुनिल काटे, शहर अभियंता हर्षजीत घाटगे, उपहशहर अभियंता नारायण भोसले, एन.एस.पाटील, रमेश कांबळे, सतीश फप्पे, उपशहर रचनाकार रमेश मस्कर, पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्राबरे, मुख्य आरोग्य निरिक्षक सुधाकर चल्लावाड आदींच्या नेतृत्वाखाली महापालिका कर्मचारी कार्यरत होते.