रविवारी कोल्हापुरात धर्मादाय महा-आरोग्य शिबिर
schedule04 Oct 23 person by visibility 757 categoryआरोग्य

: धर्मादाय सह आयुक्त कार्यालय कोल्हापूर विभाग, कोल्हापूर रिजन ट्रस्ट प्रॉक्टिशनर बार असोसिएशन व कोल्हापूर विभागातील सर्व धर्मादाय रुग्णालये यांचे संयुक्त विद्यमाने धर्मादाय संघटनेतर्फे रविवारी आठ ऑक्टोबर २०२३ रोजी, ताराराणी विद्यापीठ व्ही.टी. पाटील हॉल, राजाराम रोड येथे सकाळी १० ते दुपारी चार या वेळेत सर्व रोग निदान महा-आरोग्य शिबीराचे आयोजित करण्यात आले असल्याची माहिती धर्मादाय सहआयुक्त निवेदिता पवार यांनी दिली आहे.
या शिबीरामध्ये नेत्ररोग, दंतविकार, त्वचारोग, न्युरो, एचआयव्ही, ह्दयरोग, स्त्रीरोग, कॅन्सर, कान नाक घसा, ऑर्थोपेडिक, किडनी, होमिओपॅथिक, आयुर्वेदिक विभाग आदी सेवा मोफत उपलब्ध होणार आहेत. शिबीरामध्ये कोल्हपूर शहर आणि जिल्ह्यातील १८ हॉस्पिटल, सांगली २२ हॉस्पिटल, रत्नागिरी 5 हॉस्पिटल व सिंधुदूर्ग जिल्ह्यातील ३ हॉस्पिटल सहभागी होणार आहेत. कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली येथील आणि सिंधुदूर्ग येथील सर्व धर्मादाय रुग्णालयांचे पथक शिबीरात आरोग्य तपासणी करणार आहेत.
शिबीराचा उद्देश हा कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली येथील आणि सिंधुदूर्ग येथील गरीब व दुर्बल घटकातील लोकांनी महागड्या उपचारांकरिता मुंबई, पुणे सारख्या शहरात दूर न जाता कोल्हापूर विभागातील सर्व धर्मादाय रुग्णालयांमध्येच विविध प्रकारच्या रुग्ण सेवा उपलब्ध करुन देणे हा आहे.
शिबिराचे उद्घाटन आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या हस्ते होणार आहे. पालकमंत्री दीपक केसरकर हे अध्यक्षस्थानी असतील. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, धर्मदाय आयुक्त महेंद्र महाजन तसेच स्थानिक खासदार व आमदार उपस्थित राहणार आहेत. पत्रकार परिषदेला उपायुक्त के आर सुपाते, सहाय्यक धर्मादाय आयुक्त शरद वाळवेकर शिवराज नायकवडी, अधीक्षक विशाल क्षीरसागर, निरीक्षक महादेव जावळे उपस्थित होते