बायोगॅस प्रकल्पात गोकुळचे कार्य कौतुकास्पद, योजना लवकरच देशभर ! केंद्रीयमंत्री पुरुषोत्तम रुपाला
schedule22 May 23 person by visibility 337 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : “दुग्ध व्यवसाय ग्रामीण अर्थव्यवस्थेचा प्रमुख स्तंभ बनला आहे. शिवाय बायोगॅस प्रकल्प दुग्ध व्यवसायातील अर्थव्यवस्थेचे एक प्रमुख घटक आहे बायोगॅसचा उपयोग पर्यावरणातील समतोल राखण्यास होत आहे. वेस्ट मे व्हॅल्यू’ (टाकाऊ ची किंमत )यानुसार हा प्रोजेक्ट आहे. गोकुळ दूध संघाने चांगल्या प्रकारे बायोगॅस प्रकल्प राबविला आहे. भविष्यात गोकुळच्या सहयोगातून बायोगॅस प्रकल्प जास्तीत जास्त दूध उत्पादकांना उपलब्ध करून द्यावेत. ही योजना लवकरच देशभरात पोहचेल ”असे उद्गार केंद्रीय पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी काढले.
एनडीडीबी, कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ, पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ, भंडारा जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघांच्या संयुक्त विद्यमाने ‘गोबर से समृध्दी’ कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्याचा शुभारंभ पुणे येथे झाला. एनडीडीबीचे अध्यक्ष मिनेश शाह, पुणे जिल्हा सहकरी दूध संघाचे चेअरमन श्रीमती केशर पवार, गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील, भंडारा जिल्हादूध संघाचे संचालक विनायक बुरदे यांची प्रमुख उपस्थिती होती. अण्णाभाऊ साठे सभागृहात कार्यक्रम पार पडला.
गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील म्हणाले, “एनडीडीबी मृदा सिस्टीमाच्या तांत्रिक सहकार्याने ‘गोबर से समृद्धी’ कार्यक्रम राबवित आहोत. एनडीडीबीने ५००० बायोगॅससाठी मंजुरी दिली होती. यासाठी ९००० दूध उत्पादकांनी नोंदणी केली आहे. आजअखेर १,५०० बायोगॅस बसविले आहेत. उर्वरित बायोगॅस डिसेंबर २०२३ अखेर बसविले जातील. बायोगॅस योजनेमुळे दूध उत्पादक महिलांची कष्टाची कामे कमी झाली. महिलांना घरच्याघरी स्वयंपाकसाठी गॅस उपलब्ध झाला आहे. गॅस सिलेंडरच्या खर्चाची मासिक बचत झाली आहे. शिवाय बायोगॅस स्लरी शेतीला, वैरणीचा प्लॉटला सोडल्यामुळे वैरण व इतर उत्पादनात वाढ झाली. जमिनीची सुपीकता वाढली. दूध उत्पादनही भर पडली.”
कार्यक्रमाला गोकुळचे जेष्ठ संचालक अरुण डोंगळे, बाबासाहेब चौगले, अजित नरके, शशिकांत पाटील, किसन चौगले, नंदकुमार ढेंगे,अमरसिंह पाटील, करणसिंह गायकवाड, प्रकाश पाटील, संभाजी पाटील,बयाजी शेळके, बाळासाहेब खाडे, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, एनडीडीबीचे अनिल हातेकर, संदीप भारती, सिस्टिमा कंपनीचे पियुष सोहानी आदी उपस्थित होते.
…………..
गोकुळमुळे आत्मविश्वास वाढला….
कार्यक्रमासाठी गोकुळ बायोगॅस योजनेच्या लाभार्थी १०० महिला उपस्थित होत्या.
कागल तालुक्याीतल बाचणी येथील गीतांजली सागर पाटील तसेच गडहिंग्लज तालुक्यातील भडगाव येथील श्रीमती नंदा चिदानंद जोगोजे या बायोगॅस योजनेच्या लाभार्थी व गोकुळच्या महिला दूध उत्पादकांनी मनोगत व्यक्त केले. बायोगॅसमुळे होणारा नफा तसेच दुग्धव्यवसायामुळे आर्थिक स्थिती कशी सुधारली याची माहिती दिली. आमच्यासारख्या सामान्य दूध उत्पादकांना आधुनिक पद्धतीने दुग्ध व्यवसाय करण्याचा आत्मविश्वास गोकुळमुळेच आम्हाला मिळाला असे सांगितले.