दुग्ध व्यवसायाच्या वाढीसाठी संतुलित आहार महत्वाचा : डॉ. सत्यजित सतपथी
schedule02 Dec 23 person by visibility 383 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :
“दुग्ध व्यवसायामध्ये जनावरांचा संतुलित आहार फार महत्वाचा आहे. या व्यवसायात जास्तीत जास्त खर्च हा जनावरांच्या आहारावरती होतो. हा खर्च कमी होण्यासाठी तसेच जनावरांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी, योग्य पालन पोषण, दूध देण्याची क्षमता वाढण्यासाठी व प्रजननासाठी संतुलित आहार अत्यंत महत्वाचा आहे यासाठी दूध उत्पादकांनी जनावरांना दुधाच्या प्रमाणात पशुखाद्य व मिनरल मिक्श्चर वापर करणे गरजेचे आहे.”असे मत एक्झॉटिक बायोसोल्युशन,बेंगलोरचे डॉ. सत्यजित सतपथी यांनी व्यक्त केले.
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघातर्फे (गोकुळ) दूध वाढ व गुणवत्ता सुधारणा कार्यशाळा आयोजित केली होती. दूध उत्पादन वाढीसाठी पशुआहार व मिनरल मिक्श्चरचे महत्व या विषयावसंबंधी त्यांनी मार्गदर्शन केले. गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. ताराबाई पार्क येथील गोकुळच्या कार्यालयात कार्यक्रम झाला.
डॉ. सतपथी म्हणाले, ‘जनावरांचा भाकडकाळ कमी करण्यासाठी व दूध उत्पादन वाढीसाठी गोकुळचे महालक्ष्मी पशुखाद्य व मिनरल मिक्श्चर हे जनावरांना हे वरदानच आहे असे मनोगत व्यक्त केले. तसेच समुद्र वनस्पतीपासून बनवलेले पशुखाद्यपूरक गुणवंतापूर्ण महालक्ष्मी फर्टिमिन प्लस हे मिनरल मिक्श्चर का वापरावे.’
गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले, ‘गोकुळमार्फत दूध उत्पादकांसाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. गोकुळने आहार संतुलन कार्यक्रम राबविला असून भविष्यात हा कार्यक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्याची जबाबदारी प्रत्येक आहार संतुलन कार्यक्रम स्वयंसेवकांची आहे.
महालक्ष्मी पशुखाद्य व्यवस्थापक डॉ.व्ही.डी.पाटील यांनी प्रास्ताविक केले. एम.पी.पाटील यांनी सूत्रसंचालन केले. व्ही.टी.पाटील यांनी आभार मानले. याप्रसंगी संचालक अजित नरके, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, संकलन व्यवस्थापक एस.व्ही.तुरंबेकर,पशुसंवर्धन व्यवस्थापक डॉ.उदय मोगले, डॉ.दयावर्धन कामत, युनोव्हेट मार्केटिंगचे प्रतिनिधी विद्याधर जोशी, विलास कुलकर्णी उपस्थित होते.