भाजपा अंतर्गत वाद शमेना, कोल्हापुरातही पडघम !
schedule25 Sep 23 person by visibility 473 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. एकीकडे प्रदेशाध्यक्षांचा दौरा यशस्वी करण्यासाठी नियोजन सुरू असताना दुसरीकडे भाजपातंर्गत वादही उफाळून येत आहे. आजरा, गडहिंग्लज, शिरोळ पाठोपाठ आता कोल्हापुरातही वादाचे पडघम वाजू लागले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपातर्फे सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले आहे. या उपक्रमांचा आढावा घेण्यासाठी तसेच प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या दौऱ्याचे नियोजन यासंबंधी खासदार धनंजय महाडिक यांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडली.
भाजपा कार्यालयात रविवारी बैठक झाली. या बैठकीला माजी नगरसेवक सुभाष रामुगडे उपस्थित होते. ते पूर्वी भाजपाचे नगरसेवक होते. दरम्यान रामुगडे यांच्या बैठकीच्या उपस्थितीवरुन माजी नगरसेवक विजय खाडे यांनी आक्षेप घेतला. खाडे म्हणाले, ‘काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी नुकतीच जनसंवाद पदयात्रा काढली. या पदयात्रेत रामुगडे सहभागी झाले होते. रामुगडे हे काँग्रेसच्या जनसंवाद पदयात्रेत सामील होतात, दुसरीकडे भाजपाच्या बैठकीलाही उपस्थित राहतात. पक्षात असे कसे चालेल ?’ माजी नगरसेवक अजित ठाणेकर यांनीही रामुगडे यांच्याविषयी आक्षेप नोंदविताना या प्रकरणी पक्षाने त्यांच्यावर कारवाई करावी असा मुद्दा मांडला. अखेर खासदार महाडिक यांनी यामध्ये हस्तक्षेप केला. चौकशी करुन निर्णय घेऊ असे सांगितले.
आजरा, गडहिंग्लज आणि शिरोळ तालुक्यात भाजपातंर्गत वाद सुरू आहे. जुने आणि नवे हे त्याचे कारण आहे. कार्यकारिणीत जुन्या कार्यकर्त्यांना संधी मिळाली नाही म्हणून आजरा येथे भाजपा कार्यालयाला कुलूप लावण्याचा प्रकार घडला होता. नव्याने पक्षात आलेल्यांना पदे दिल्याचा आरोप करत गडहिंग्लज, शिरोळ येथील कार्यकर्त्यांनी तक्रारी केल्या आहेत. यामुळे भाजपात सध्या अंतर्गत धुसफूस सुरू आहे. गडहिंग्लज येथील नाराज कार्यकर्त्यांना खासदार महाडिक यांनी सोमवारी (२५ सप्टेंबर ) भेटीसाठी बोलावले आहे.
............