अमल महाडिकांनी घेतली आयुक्तांची भेट, शहरातील रस्ते हस्तांतरण बांधकाम विभागाकडे !
schedule24 Nov 23 person by visibility 354 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर: कोल्हापूर शहरात प्रवेश करणारे सर्व रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करण्यासाठी ना हरकत दाखला त्वरित द्यावा अशी मागणी माजी आमदार अमल महाडिक यांची महापालिका प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांच्याकडे केली.
कोल्हापूर शहरात प्रवेश करणाऱ्या रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाल्यामुळे हे सर्व रस्ते राज्यमार्ग घोषित करून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करावेत अशा आशयाची मागणी माजी आमदार महाडिक यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे केली होती. त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद आल्यानंतर महाडिक यांनी कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रशासक मंजुलक्ष्मी यांची नुकतीच भेट घेतली. यावेळी माजी नगरसेवक सत्यजित कदम उपस्थित होते.
रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करण्यासाठी आवश्यक असलेला ना हरकत दाखला महानगरपालिकेकडून विनाविलंब मिळावा अशा आशयाचे पत्र त्यांनी आयुक्तांना सादर केले. आयुक्तांनी सकारात्मकता दाखवत लवकरच ना हरकत दाखला सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठवला जाईल असे आश्वासन दिले.
दरम्यान या हस्तांतरणामुळे कोल्हापूर महानगरपालिकेवर सदर रस्त्यांच्या डागडूजीपोटी पडणारा मोठा आर्थिक भार हलका होणार असून भाविक आणि नागरिकांचीही सोय होणार असल्याचे महाडिक यांनी म्हटले आहे.