हसन मुश्रीफांकडून आदिल फरासांची उमेदवारी घोषित
schedule16 Dec 25 person by visibility 115 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांकडून उमेदवारांच्या मुलाखती सुरू आहेत. काही पक्षाकडून मुलाखतीनंतर सर्व्हेक्षण होणार आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे नेते व वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रभाग क्रमांक बारामधून राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आदिल फरास यांच्या उमेदवारीची घोषणा केली.
श्री रंकभैरव मंदिरातील दीपमाळ जीर्णोद्धार कामाचा शुभारंभ सोमवारी पंधरा डिसेंबर रोजी झाला. या समारंभाला राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष व आमदार राजेश क्षीरसागर, भाजप महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव, गोकुळचे ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे, माजी महापौर हसिना फरास, माजी उपमहापौर परिक्षित पन्हाळकर, माजी नगरसेवक सुनील पाटील, प्रकाश कुंभार, संदीप कवाळे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
मंत्री मुश्रीफ म्हणाले,‘ राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आदिल फरास यांचा विकासकामासाठी सतत पाठपुरावा असतो. महापालिका निवडणुकीसाठी महायुती म्हणून आम्ही एकत्रितपणे निवडणूक लढविणार आहोत. या प्रभागातून राष्ट्रवादीकडून आदिल फरास निवडणूक लढविणार आहेत. या समारंभाला शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर उपस्थित आहेत. भाजपचे विजय जाधव व्यासपीठावर आहेत. या दोन्ही पक्षांना फरास यांच्या उमेदवारीला पाठिंबा असेल. यामुळे या प्रभागातून आदिल फरास यांची उमेदवारी निश्चित झाली आहे असे मी समजतो. सगळयांनी त्यांना भरभरुन सहकार्य करावे.’