केएमटीचे १५६ कर्मचारी सेवेत कायम, राजेश क्षीरसागरांचा पाठपुरावा ! कर्मचाऱ्यांचा शिवालयावर जल्लोष ! !
schedule15 Dec 25 person by visibility 48 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : केएमटीमध्ये रोजंदारी तत्वावर काम करणाऱ्या १५६ कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. चालक, वाहक पदावर कार्यरत हे कर्मचारी गेली अनेक वर्षे रोजंदारी तत्वावर काम करत होते. नगरविकासमंत्री व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याच्या प्रस्तावावर सही केली. या कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आमदार राजेश क्षीरसागर यांचा पाठपुरावा सुरू होता. राज्य सरकारने हा निर्णय घेतल्याबद्दल क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत. दुसरीकडे केएमटी कर्मचाऱ्यांनी गुलाल उधळत हा आनंदोत्सव साजरा केला. सेवेत कायम झाल्याचे वृत्त कळताच के.एम.टी. कर्मचारी, आमदार क्षीरसागर यांचे संपर्क कार्यालय शिवालय शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालय येथे पोहोचले. त्यांनी, वाद्यांच्या गजरात गुलालाची उधळण करीत जल्लोष केला. के.एम.टी.च्या रोजंदारी कर्मचाऱ्यांना महापालिका सेवेत कायम करण्यास यशस्वी पाठपुरावा केल्या बद्दल के.एम.टी. कर्मचाऱ्यांच्यावतीने आमदार क्षीरसागर यांचा सत्कार केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार राजेश क्षीरसागर यांच्या विजयाच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी निशिकांत सरनाईक, अंकुश कांबळे, प्रताप येतवडे, इरशाद नायकवडी, गुंडू होसुरे, जावेद सनदी, शंकर कोटलगी, तानाजी पाटील, संभाजी बुडके, मैनुद्दीन मुल्लाणी उपस्थित होते.