वारी आनंदाची ! कोल्हापूर जिल्हा परिषदेची हमी शुद्ध पाणी पुरवठ्याची !!
schedule15 Jul 26 person by visibility 255 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : आषाढी वारीमध्ये सहभागी वारकऱ्यांना पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळावे म्हणून कोल्हापूर जिल्हा परिषदेने, 'वारी आनंदाची, हमी शुद्ध पाणी पुरवठ्याची' हा उपक्रम सुरू केला. तब्बल दहा हजार लिटर क्षमतेचा पाण्याचा टँकर बुधवारी (15 जुलै 2026) रोजी पंढरपूरकडे रवाना झाला.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिल्पा शशिकांत खोत व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.जॅसमिन यांच्या हस्ते टँकरचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी बांधकाम समिती सभापती सारिका नांदेकर, शिक्षण समिती सभापती शितल यादव, जिल्हा परिषदेचे सदस्य अभिजीत तायशेटे, ग्रामीण पाणी पुरवठ्याचे कार्यकारी अभियंता अर्जुन गोळे, जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुद्ध पिंपळे, सहाय्यक लेखाधिकारी संतोष ओतारी यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आले तसेच टँकर चालकाला हे श्रीफळ वाढवण्याचा मान दिला गेला. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागातर्फे आषाढी वारीनिमित्त वारकऱ्यांच्यासाठी हा शुद्ध पिण्याच्या पाण्याचा टँकर सुरू केला आहे. आषाढी एकादशीनिमित्त लाखो वारकरी पंढरीच्या दर्शनासाठी धाव घेतात. या वारकऱ्यांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने हा उपक्रम हाती घेतला आहे.
जिल्हा परिषद अध्यक्षा शिल्पा खोत यांनी, "वारकऱ्यांना सुविधा देण्याच्या हेतूने हा टँकर उपलब्ध केला आहे" असे सांगितले. तसेच त्यांनी वारीमध्ये अपघात होऊन जे वारकरी मृत्युमुखी पडले त्यांना श्रद्धांजली वाहिली. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन म्हणाल्या , " कोल्हापूर जिल्हा परिषदेने वारकऱ्यांच्यासाठी हा टँकर उपलब्ध केला आहे. आषाढी वारीपर्यंत या टँकरद्वारे वारकऱ्यांना शुद्ध पाणीपुरवठा केला जाईल. पाण्याची तपासणी करून पाणी वितरित केले जाणार आहे. त्याची केंद्रे ही निश्चित केले आहेत'