२२ कोटीचा प्रोजेक्ट कर्जाच्या माध्यमातून उभारणार, जिपच्या स्थायी समितीत ठराव
schedule17 Sep 26 person by visibility 54 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या गुरुवारी झालेल्या सभेत भाऊसिंगजी रोडवरील मालकीच्या जागेवरील प्रस्तावित व्यापारी संकुलची उभारणी कर्जाच्या रकमेतून करण्याचा ठराव झाला. स्थायी समितीकडून यासंबंधीची शिफारस जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेकडे केले जाणार आहे. सर्वसाधारण सभा २३ सप्टेंबर २०२६ रोजी आहे. दरम्यान जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिल्पा खोत या सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या.
या सभेत बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मानसिंग पाटील यांनी, भाऊसिंगजी रोडवरील प्रस्तावित इमारतीचा नकाश तयार केला आहे.असे सांगितले. त्यांनी, प्रस्तावित इमारतीची माहिती दिली. ही जागा विकसित करण्यासाठी जवळपास २२ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. शिक्षण समिती सभापती शीतल प्रविण यादव, समाजकल्याण समिती सभापती श्रद्धा अविनाश गायकवाड, महिला व बालकल्याण समिती सभापती विद्या विलास पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही सभा झाली. या सभेत सदस्य संग्रामसिंह कुपेकर व अमरसिंह पाटील यांनी करवीर पंचायत समितीच्या इमारतीसाठी कागलकर हाऊस जवळील जागा न देता शेंडापार्क येथील जागा द्यावी अशी सूचना केली. सदस्य सुधीर देसाई यांनी, ‘आजरा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये औषधांचा तुटवडा जाणवत आहे. यासंबंधी चौकशी क रुन जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी अहवाल सादर करावा’ अशी सूचना केली. सदस्य शिवाजी जाधव यांनी,‘ हातकणंगले तालुक्यातील ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील कामे डिसेंबर अखेर पूर्ण करावीत अशी सूचना केली. सभेतील चर्चेत सदस्य जयंत पाटील यांनीही सहभाग घेतला. या सभेत शिक्षण, महिला व बालकल्याण, पशुसंवर्धन, समाजकल्याण विभागातील विषयावर चर्चा झाली. सभेसमोर एकूण २९ विषय होते. मुख्य वित्त व लेखा अधिकारी अतुल आकुर्डे, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.