विश्वास पाटील यांचे दोन गटातून अर्ज दाखल ! सुरेश देसाई, सुरेश कुराडेंनी भरला उमेदवारी अर्ज !!
schedule16 Sep 26 person by visibility 14 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी बुधवारी, १६ सप्टेंबर २०२६ रोजी माजी चेअरमन विश्वास पाटील यांनी उमेदवार अर्ज दाखल केला. त्याशिवाय शेतकरी संघाचे माजी कार्यकारी संचालक सुरेश देसाई, काँग्रेसचे पदाधिकारी सुरेश कुराडे यांनी अर्ज भरले आहेत. गोकुळचे माजी चेअरमन विश्वास पाटील यांनी सर्वसाधारण व इतर मागास प्रवर्ग गटातून उमेदवारी अर्ज भरला आहे. दरम्यान गेल्या दोन दिवसात गोकुळच्या निवडणुकीसाठी तब्बल ६०० उमेदवारी अर्जांची विक्री झाली आहे.
रमणमळा येथील बहुउद्देशीय सभागृह येथे निवडणूक कार्यालय आहे. निवडणूक निर्णय अधिकारी मोसमी चौगुले यांच्याकडे उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. सर्वसाधारण गटातून गोकुळचे माजी चेअरमन विश्वास पाटील, त्यांचे पुत्र सचिन पाटील, स्नुषा पल्लवी पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. निगवे दुमाला येथील हंबीरराव शंकर वळके, भुदरगड तालुक्यातील म्हसवे येथील सुरेश बाबूराव देसाई यांनी अर्ज भरला. महिला राखीव गटातून गडहिंग्लज तालुक्यातील ऐनापूर येथील सुरेखा सुरेश कुराडे, शिरोली दुमाला येथील पल्लवी सचिन पाटील, बांबवडे येथील वंदना आदिनाथ भावके यांनी अर्ज दाखल केला. इतर मागास प्रवर्ग गटातून गडहिंग्लज तालुक्यातील सुरेश तुकाराम कुराडे, गोकुळचे माजी चेअरमन विश्वास पाटील, सचिन पाटील यांनी अर्ज दाखल केले.
दरम्यान गोकुळच्या अंतिम मतदार यादीत अवसायानतील ४९२ संस्थेच्या समावेशला आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली.या संस्थेला न्याय मिळावा म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व मंत्री हसन मुश्रीफ आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांनी बळ दिले होते.