एम्सच्या धर्तीवर राज्यातील सरकारी २७ रुग्णालये सुसज्ज होणार : मंत्री हसन मुश्रीफ
schedule08 Oct 23 person by visibility 445 categoryआरोग्य

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : “धर्मादाय रुग्णालय तसेच सर्वच शासकीय-खाजगी रुग्णालयांनी प्रामाणिकपणे आरोग्य सेवा करून रुग्णांना मदत करणे काळाची गरज निर्माण झाली आहे. महात्मा फुले जन आरोग्य योजनेसारख्या महत्त्वपूर्ण योजनेची अंमलबजावणी यशस्वीपणे करण्याची जबाबदारी सर्व आरोग्य यंत्रणेवर आहे. राज्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या संलग्नित २७ रुग्णालये असून येत्या काळात त्या सर्व रुग्णालयांमध्ये एम्स रुग्णालयाच्या धर्तीवर सुसज्ज सेवा देण्याचे काम विभागामार्फत करण्यात येणार आहे .”असे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.
कोल्हापूर येथे धर्मादाय संघटना महाराष्ट्र राज्य व धर्मदाय सह आयुक्त कार्यालय कोल्हापूर विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महाआरोग्य शिबिरात उद्घाटन प्रसंगी अध्यक्षस्थानावरून बोलत होते. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी धर्मदाय आयुक्त महेंद्र महाजन, खासदार धनंजय महाडिक,राज्य नियोजन मंडळ कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर, ताराराणी विद्यापीठ अध्यक्ष क्रांतिकुमार पाटील, धर्मदाय सह आयुक्त कोल्हापूर विभाग निवेदिता पवार, कोल्हापूर बार आसोसिएशनचे अध्यक्ष ॲड.दीपक पाटील, सचिव ॲड. कीर्ती कुमार शेंडगे, धर्मदाय उपायुक्त कोल्हापूर कांचनगंगा सुपाते, सहाय्यक धर्मादाय आयुक्त शरद वाळके, अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, धर्मदाय सह आयुक्त मुंबई रुबी मालवणकर, धर्मदाय उपायुक्त सांगली मनीष पवार, अधीक्षक शिवराज नाईकवाडे, अधीक्षक विशाल क्षीरसागर उपस्थित होते.
आरोग्यमंत्री सावंत म्हणाले “धर्मदाय रुग्णालयांमधून सर्वसामान्य नागरिकांना आवश्यक आरोग्य सेवा चांगल्या प्रकारे मिळत नसल्याच्या नेहमीच तक्रारी सरकारकडे येत असतात. यासाठी रुग्णांना घरी बसूनच यापुढे धर्मदाय रुग्णालयातील आपले बेड मोबाईल ॲपच्या द्वारे आरक्षित करता येणार आहे. यासाठी मोबाईल ॲप सुरू करण्याचे काम सुरू आहे. येत्या दिवाळीपूर्वी रुग्णांना धर्मदाय रुग्णालयात आपल्याला आवश्यक असलेली सेवा सहज घेता येणार आहे.’’
यावेळी धर्मादाय आयुक्त महेंद्र महाजन यांनी मनोगत व्यक्त केले. धर्मादाय सह आयुक्त कोल्हापूर निवेदिता पवार यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंदा शिंदे राशिवडेकर यांनी केले. दरम्यान ताराराणी विद्यापीठातील डॉ. व्ही. टी. पाटील सभागृह येथे शिबिराचे आयोजन केले होते. कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली येथील आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील धर्मादाय रुग्णालयांचे पथक शिबीरात सहभागी आहेत.