रस्ते दुरुस्तीसाठी शिवसेना ठाकरे गटाचा हल्लाबोल ! महापालिका अधिकाऱ्यांना घेराव !!
schedule07 Nov 23 person by visibility 262 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील खराब रस्त्यावरून शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी महापालिकेवर धडक मोर्चा काढून अधिकाऱ्यांना घेराव घातला. " चला चला दिवाळी आली - खड्डे दुरुस्तीची वेळ आली, रस्ते आमच्या हक्काचे - नाही कुणाच्या बापाचे, हल्लाबोल हल्लाबोल- जनतेसाठी हल्लाबोल,"अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी महापालिका परिसर दणाणून सोडला. शहरातील खराब रस्ते , पॅचवर्कची कामे यावरून अधिकाऱ्यावर प्रश्नांचा भडीमार केला.
शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, शहर प्रमुख रवीकिरण इंगवले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. शहरात रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. शहरातील रस्त्यांची चाळण झाली आहे. अधिकाऱ्याने चार चाकीतून फिरण्यापेक्षा दुचाकीवरुन शहरातून प्रवास केल्यास त्यांना नागरिकांच्या व्यथा समजतील अशा शब्दात महापालिकेच्या कामकाजाचा समाचार घेतला. " "महापालिका कायदा नुसार चालतं की कोणाच्या इशाऱ्यावर, काम जमत नसेल तर दोघांनीही राजीनामा द्या" अशी मागणी संजय पवार यांनी केली. शहरप्रमुख रविकिरण इंगवले म्हणाले, " शहरातील रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे का होत नाहीत ? अधिकारी सक्षमपणे कामे करत नाहीत, अधिकाऱ्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही. जे ठेकेदार कामे करत नाहीत त्यांना तात्काळ ब्लॅक लिस्ट करा". जवळपास अर्धा तास चर्चा झाली. वारंटी कालावधीतील रस्त्यांची कामे न केलेल्या सात ठेकेदारांना तत्काळ ब्लॅक लिस्ट करा आणि ते जाहीर करा अशी मागणी केली. बुधवारी , आठ नोव्हेंबर रोजी शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते व महापालिकेचे अधिकारी यांनी संयुक्तपणे शहरातील रस्त्यांची पाहणी करण्याचे ठरले. मिरजकर तिकटी येथून पाहणीचा सुरुवात होईल.
आंदोलनात माजी नगरसेवक दत्ता टिपुगडे, प्रतिज्ञा उत्तुरे, महिला संघटक स्मिता सावंत, अवधूत साळोखे, शशिकांत बिडकर, विशाल देवकुळे, पोपट दांगट, दिलीप देसाई, राजेंद्र पाटील, विनोद खोत, राहुल गिरोले, संतोष जाधव, राजू यादव, दिनेश साळोखे, रुपाली घोरपडे, प्रेरणा बाकळे, अनिल पाटील , मंजित माने, राजू जाधव, धनाजी यादव, समरजीत जगदाळे, विशाल चव्हाण, दिपाली शिंदे, विराज ओतारी, अभिजीत ओतारी, धनाजी दळवी, तानाजी पोवार, शुभांगी पोवार, माधुरी जाधव, प्रसाद पोवार, पवन बोचगिरी, योगेंद्र माने, सागर पंतोजी, संजय धुमाळ, राहुल माळी, उदय जाधव यांचा समावेश होता.