हातकणंगलेत चौरंगी लढत, ठाकरे गटाकडून सत्यजित पाटील !
schedule03 Apr 24 person by visibility 682 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : हातकणंगले लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून उमेदवार कोण हा गेली अनेक दिवस चर्चेत असलेला प्रश्न बुधवारी निकालात निघाला. राजू शेट्टी आणि महाविकास आघाडी एकत्र आले नाहीत. महाविकास आघाडी अंतर्गत शिवसेना ठाकरे गटाकडून माजी आमदार सत्यजित पाटील यांची उमेदवारी घोषित झाली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीच पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा केली.
हातकणंगले लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार धैर्यशील माने, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, महाविकास आघाडीकडून सत्यजित पाटील, आणि वंचित बहुजन आघाडीकडून डी.सी. पाटील असे चार प्रमुख उमेदवार रिंगणात असणार आहेत. या मतदारसंघात वंचितची मते ही लक्षणीय आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी पहिल्यापासूनच एकला चलो रेचा नारा दिला होता. तर महाविकास आघाडीकडून त्यांनी चिन्हावर निवडणूक लढवावी असा आग्रह होता. विशेषतः शिवसेना ठाकरे गटाच्या चिन्हावर शेट्टी यांनी निवडणूक लढवावी यासाठी प्रयत्न सुरू होते. मात्र शेट्टी यांनी महाविकास आघाडीत सामील न होता स्वाभिमानी स्वतंत्रपणे निवडणूक लढवेल हा आपला पवित्रा कायम ठेवला. यामुळे या मतदारसंघात महाविकास आघाडी व शेट्टी यांच्यामध्ये एकमत होऊ शकले नाही. बुधवारी शिवसेना ठाकरे गटातर्फे सत्यजित पाटील यांची उमेदवारी जाहीर झाली. पाटील हे माजी आमदार आहेत. पन्हाळा- शाहूवाडी मतदार संघातून त्यांनी आमदार म्हणून प्रतिनिधित्व केले आहे.
हातकणंगले मतदारसंघांमध्ये महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्हींमध्ये यंदा उमेदवारीवरुन बरीच खलबते झाली. महायुतीकडून उमेदवार बदलणार अशाही चर्चा झाल्या. मात्र शिवसेना शिंदे गटाला या मतदारसंघातील उमेदवारी कायम ठेवण्यात यश मिळाले. धैर्यशील माने हे दुसऱ्यांदा निवडणूक लढवीत आहेत. वंचित बहुजन आघाडीने जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डी.सी.पाटील यांना उमेदवारी दिली आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदार सघात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवारांनी एक लाख तीस हजारांहून अधिक मते मिळवली होती.