नगरसेविका, महिला अधिकारी क्रिकेटच्या मैदानावर! शिक्षिकेनही लुटला खेळाचा आनंद ! !
schedule09 Mar 26 person by visibility 113 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : महापालिकेतील महिला अधिकारी, नगरसेविका आणि महिला शिक्षकांनी क्रिकेटच्या मैदानावर उतरत खेळाचा आनंद लुटला. निमित्त होतं, महिला दिनानिमित्त कोल्हापूर महापालिकेच्यावतीने आयोजित महिला क्रिकेट स्पर्धेचे.
शास्त्रीनगर येथील मैदानावर झालेल्या या स्पर्धेचे उद्घाटन महापालिका महापौर रुपाराणी निकम व आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेला महिला नगरसेविका, महापालिकेतील महिला अधिकारी-कर्मचारी तसेच महिला शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्पर्धेमध्ये विद्यमान महिला नगरसेविकांचा ब्ल्यू संघ, रेड संघ तसेच महापालिकेच्या महिला शिक्षकांचा ‘कोल्हापूर वॉरियर्स’ असा तीन संघांचा सहभाग होता. स्पर्धेतील सामने अतिशय रंगतदार झाले. अंतिम निकाल रनरेटच्या आधारे जाहीर करण्यात आला. त्यामध्ये महापौर रुपाराणी निकम यांच्या नेतृत्वाखालील रेड संघाने विजेतेपद पटकावले, तर महिला शिक्षकांचा ‘कोल्हापूर वॉरियर्स’ संघ उपविजेता ठरला.
पहिल्या सामन्यात टीम ब्ल्यूने प्रथम फलंदाजी करत ३ गडी बाद ५५ धावा केल्या. यामध्ये नेहा तेंडुलकर यांनी २५ तर निलांबरी साळुंखे यांनी १६ धावांचे योगदान दिले. गोलंदाजीत दिपाली घाटगे व डॉ. सुषमा जरग यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. उत्तरादाखल टीम रेडने उत्कृष्ट फलंदाजी करत १० गडी राखून ५६ धावांचे लक्ष्य गाठले. महापौर रुपाराणी निकम यांनी ३२ धावांची दमदार खेळी केली, तर दिपाली घाटगे यांनी ११ धावांचे योगदान दिले.
दुसरा सामना ब्ल्यू संघ व महापालिकेच्या ‘कोल्हापूर वॉरियर्स’ महिला संघामध्ये झाला. ब्ल्यू संघाने प्रथम फलंदाजी करत १ गडी बाद ३३ धावा केल्या. यामध्ये निलांबरी साळुंखे यांनी १८ धावा केल्या, तर प्रियंका चौगुले यांनी १ विकेट घेतली. प्रत्युत्तरादाखल कोल्हापूर वॉरियर्स संघाने १० गडी राखून ३४ धावा करत विजय मिळवला. गीता काळे यांनी १७ तर स्वाती चौगुले यांनी १३ धावांचे योगदान दिले. तिसऱ्या अंतिम सामन्याचा निकाल रनरेटच्या आधारे जाहीर करण्यात आला. त्यानुसार महापौर निकम यांच्या रेड संघाला विजेता, तर महिला शिक्षकांच्या ‘कोल्हापूर वॉरियर्स’ संघाला उपविजेता घोषित करण्यात आले. स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरीबद्दल महापौर सौ.रुपाराणी निकम यांना ‘मॅन ऑफ द सिरीज’ पुरस्काराने गौरविण्यात आले.सामना पाहण्यासाठी गटनेते व सभागृह नेते मुरलीधर जाधव, नगरसेवक बबन मोकाशी, प्रतिज्ञा उत्तुरे, जयश्री चव्हाण तसेच सहाय्यक आयुक्त उज्वला शिंदे उपस्थित होते. स्पर्धेचे आयोजन उपायुक्त किरणकुमार धनवाडे, काकासाहेब पाटील तसेच क्रीडा निरीक्षक सचिन पांडव यांनी केले.