महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ना कोणत्या घोषणा, ना पक्षीय आणि संघटनेचे फलक, मात्र प्रत्येकाच्या मनी सामाजिक एकोप्याची भावना. सोबतीला तिरंगा ध्वज, संविधानाची प्रत आणि राष्ट्पुरुषांचे फलक…कोल्हापुरात गुरुवारी सायंकाळी निघालेल्या शिव-शाहू सदभावना यात्रेने सामाजिक एकोप्याची आणखी घट्ट विणली. गजापूर येथे घडलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर समाजात सलोखा राहावा यासाठी काढलेल्या यात्रेत मोठया संख्येने सहभाग होत नागरिकांनी सामाजिक एकोप्यावरील विश्वास आणखी दृढ केला. समता आणि बंधुत्वारील विश्वास आणखी दृढ केला.
इंडिया आघाडीतर्फे या रॅलीचे आयोजन केले होते. नर्सरी बाग येथील राजर्षी शाहू महाराज यांच्या समाधीस्थळापासून सायंकाळी पाच वाजता सद्भावना यात्रा निघाली. खासदार शाहू महाराज छत्रपती, आमदार सतेज पाटील, आमदार जयश्री जाधव, आमदार जयंत आसगावकर, युवराज मालोजीराजे छत्रपती, माजी आमदार सत्यजित पाटील आदी यात्रेच्या अग्रभागी होते. क्रांतिवीर चिमासाहेब महाराज चौक, सीपीआर चौक मार्गे यात्रा भाऊसिंगजी रोडवरुन मार्गस्थ झाली. महापालिका मार्गे सद्भावना यात्रा छत्रपती शिवाजी चौकात पोहोचली. कोणत्याही प्रकारची घोषणा न देता मूकपणे यात्रा काढण्यात आली. राष्ट्रगीताने या रॅलीची सांगता झाली.
या रॅलीमध्ये शिवसेनेचे उपनेते संजय पवार, सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही.बी.पाटील, ए. वाय. पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील, माजी महापौर आर.के. पोवार, अॅड. महादेवराव आडगुळे, मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाबासाहेब देवकर, माजी नगरसेवक विक्रम जरग, दिगंबर फराकटे, माणिक मंडलिक, भारती पोवार, राजेंद्र लाटकर, पद्मजा तिवले, अशोक भंडारे, इंद्रजित बोेद्रे, रवी आवळे, प्रताप जाधव, संध्या घोटणे, धनंजय सावंत, राहुल खंजिरे, मुस्लिम बोर्डिंगचे गणी आजरेकर, गोकुळचे माजी संचालक रामराजे कुपेकर, डाव्या चळवळीतील प्रा. मेघा पानसरे, सतीश कांबळे, गिरीश फोंडे, रघुनाथ कांबळे, सीमा पाटील, शिवछत्रपती पुरस्कार विजेते आर. डी. पाटील, प्रा. सुभाष जाधव, अशोक भंडारे, हिदायत मणेर, इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांच्यासह नागरिकांचा मोठा सहभाग होता.