त्या प्राध्यापकांवर कारवाई कधी ? विद्यापीठाने बोलावली फेलोशिपधारक विद्यार्थ्यांची बैठक
schedule16 Aug 25 person by visibility 440 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, काल्हापूर : पीएचडी संशोधक विद्यार्थ्याकडे पैशाची मागणी करणाऱ्या कोल्हापुरातील त्या प्राध्यापक-गाईडवर कारवाई कधी ? असा प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे. त्या प्राध्यापकांवर कारवाई करावी असे निवेदन मनसे विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी प्रकुलगुरू पी. एस. पाटील यांच्याकडे दिले आहे. तर विद्यापीठ प्रशासनाने १९ ऑगस्ट २०२५ रोजी सारथी, बार्टी, महाज्योती व इतर फेलोशिप अंतर्गत संशोधक विद्यार्थ्यांची बैठक बोलावली आहे. विद्यापीठातील राजर्षी शाहू सभागृह येथे दुपारी तीन वाजता ही बैठक होणार आहे.
प्रकुलगुरू पाटील, कुलसचिव व्ही. एन. शिंदे, प्रभारी अधिष्ठाता श्रीमती डॉ. जी. पी. जाधव, अधिष्ठाता डॉ. एम. एस. देशमुख, अधिष्ठाता डॉ. एस. एस. महाजन, प्रभारी अधिष्ठाता प्राचार्या श्रीमती मेघा गुळवणी यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक होत आहे. महाविद्यालये व विद्यापीठ विकास विभागाने ही बैठक आयोजित केली आहे. कोल्हापूर शहरातील एका महाविद्यालयातील प्राध्यापकाने संशोधक विद्यार्थ्यांकडे पैशाची मागणी करत असलेला व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्या प्राध्यापक गाईडवरवर कारवाई करावी, गाईडशीप कायमस्वरुपी काढून घ्यावी, आतापर्यंत ज्या ज्या संशोधक विद्यार्थ्यांना गाईडशीप केली आहे, त्या साऱ्या प्रकरणाची चौकशी करावी, ज्या ज्या समितीवर त्या प्राध्यापकाची नेमणूक आहे त्या नेमणुका रद्द कराव्यात अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. याबाबतचे निवेदन मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाप्रमुख अभिजीत राऊत, शहराध्यक्ष अजिंक्य शिंदे, नितेश गणेशाचार्य, किरण येडगे, यश केंबळे यांनी प्रकुलगुरूंना दिले आहे.