कुलगुरुंच्या हाती खडू, विभागात घेतला क्लास ! सेवानिवृत्ती दिनी शिक्षक म्हणून बजावले कर्तव्य !!
schedule30 Jun 25 person by visibility 108 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शिक्षकांची कधी विद्यार्थी आणि क्लासशी जुळलेली नाळ तुटत नाही म्हणतात. सोमवारी (३० जून २०२५) रोजी शिवाजी विद्यापीठात प्रचिती आली. विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. दिगंबर शिर्के हे ३० जून रोजी संख्याशास्त्र विभागातून प्राध्यापक म्हणून सेवानिवृत्त झाले. खरं तर, त्यांच्याकडे कुलगुरुपदाची जबाबदारी. प्रशासकीय प्रमुख. प्रशासकीय कामकाज, अधिकाऱ्यांच्यासोबत बैठका असा दिनक्रम ठरलेला. मात्र त्यांनी शिक्षकी पेशेतून निवृत्त होत असताना, विद्यार्थ्यांसमोर लेक्चर देऊन अधिविभागाचा निरोप घेतला. नियत वयोमानानुसार ते संख्याशास्त्र अधिविभागातून शिक्षक म्हणून सेवानिवृत्त झाले.
शिक्षक म्हणून आपल्या अखेरच्या दिवशीही आपण विद्यार्थ्यांसमोर खडू, फळ्यावर लेक्चर घ्यावयाचे, अशी सुप्त इच्छा डॉ. शिर्के यांच्या मनी होती. ती त्यांनी त्यांच्या शिक्षक पदाच्या अखेरच्या दिवशी पूर्ण केली. व्याख्यानासाठी ते नेहमीप्रमाणे अर्धा तास आधीच संख्याशास्त्र अधिविभागात उपस्थित झाले. शिकवावयाच्या विषयाचा अभ्यास केला. आवश्यक नोट्स तयार केल्या आणि वर्गात प्रवेश केला. त्यांनी "स्टॅटिस्टिकल सिम्युलेशन अँड इट्स अॅप्लीकेशन्स" या विषयावर अतिशय सोप्या पद्धतीने, सुसंगत उदाहरणांसह व्याख्यान दिले.
खरं तर, आजचा काळ स्मार्ट क्लासरुम शिक्षणाचा असला तरी सच्चा हाडाच्या शिक्षकासाठी मात्र खडू, फळा आणि डस्टर या साधनांचेच आकर्षण असते. साधारण ४० वर्षांपूर्वी जून १९८५ मध्ये डॉ. शिर्के हे विद्यार्थी म्हणून शिवाजी विद्यापीठाच्या संख्याशास्त्र अधिविभागात दाखल झाले. तेथपासून ते आजतागायत त्यांची संपूर्ण कारकीर्द शिवाजी विद्यापीठातच घडली. शिक्षकापासून ते अधिविभाग प्रमुख पदापर्यंत आणि प्रशासनातील कुलसचिव पदापासून ते कुलगुरू पदापर्यंत त्यांनी सर्व पदे यशस्वीरित्या भूषविली. प्रशासनात असतानाही त्यांनी वेळोवेळी अधिविभागामध्ये जाऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, अध्यापन केले.
या व्याख्यानात त्यांनी अमेरिकन स्टॅटिस्टिकल असोसिएशनच्या ‘दि अमेरिकन स्टॅटिस्टिशियन’ या मान्यताप्राप्त शोधपत्रिकेमध्ये १९९१ साली प्रसिद्ध झालेल्या एका शोधनिबंधातील ‘आयलस कॉन्स्टंट’ (e) संदर्भातील संख्याशास्त्रीय सिद्धांत, संकल्पना विद्यार्थ्यांना शिकवल्या. त्या संकल्पना सोप्या, स्पष्ट आणि विद्यार्थ्यांच्या आकलनास अनुरूप अशा शब्दांत मांडल्या.
विशेष म्हणजे, अधिविभागात स्मार्ट क्लासरुम आणि स्मार्ट बोर्ड असतानाही त्यांनी हा विषय खडू आणि फळा अशा पारंपरिक पद्धतीने शिकविण्याचा आनंद घेतला. विद्यार्थ्यांनीही त्यांना उत्तम प्रतिसाद दिला. या विषयावर आधारित पुढील अभ्यास आणि संशोधनाच्या दिशांचे स्वरुप याविषयीही त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन प्राध्यापक शिर्के यांनी आपल्या अधिविभागातील शिक्षक म्हणून अखेरच्या व्याख्यानाचा समारोप केला. कोणताही औपचारिक निरोप नाही, समारंभ नाही, पुष्पगुच्छांची देवाणघेवाण नाही, झाली ती केवळ विचारांची देवाणघेवाण. कुलगुरुपदाचा बडेजाव न मिरविता एक शिक्षक म्हणून आपले कर्तव्य बजावत असताना किती निरलस भावनेने निवृत्तीकडे सरकता येते, याचा वस्तुपाठच जणू कुलगुरू शिर्के यांनी या निमित्ताने घालून दिला.