माणसांच्या दृष्टीने माझ्या इतका दुसरा कोणी श्रीमंत नाही, मी धन्य झालो- भरुन पावलो !
schedule30 Jun 25 person by visibility 239 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘ माझ्या सेवापूर्ती सदिच्छा समारंभाला लोटलेली गर्दी पाहून मन भरून आलं. एका शेतकरी कुटुंबामध्ये जन्म झालेल्या, शेतात मजुरी करणाऱ्या एका सर्वसामान्य मुलानं शिक्षण क्षेत्रात पाय टाकले. ३९ वर्षाच्या सेवेत शैक्षणिक, सामाजिक, राजकीय,अध्यात्मिक अशा सर्वच क्षेत्रात अनेक जीवाभावाचे मित्र मिळाले. आज या सर्व मित्रांनी आपल्या उपस्थितीने माझ्यावरती करत असलेल्या प्रेमाची साक्ष दिली.या उपस्थितीतीने मी भारावून गेलो. माणसांच्या दृष्टीने जगात माझ्या इतका दुसरा कोणी श्रीमंत नाही याचे आज दर्शन झाले.’असे भावोत्कट उद्गगार आहेत, शिक्षण विस्तार अधिकारी जोतिराम पाटील यांचे.
निमित्त होतं, सेवानिवृत्ती निमित्त आयोजित सत्कार आणि सदिच्छा समारंभाचे. या कार्यक्रमासाठी पालकमंत्री प्रकाश आबिटकर, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक ए वाय पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जोतिराम पाटील यांचा सत्कार करण्यात आला. मानपत्र शाल श्रीफळ असे सत्काराचे स्वरूप होते. माजी आमदार के पी पाटील यांनीही शुभेच्छा दिल्या. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष हिंदुराव चौगुले, राधानगरी पंचायत समितीचे माजी सभापती अरुण जाधव, गोकुळचे संचालक अभिजीत तायशेटे, सूतगिरणीचे चेअरमन उमेश भोईटे, बाजार समितीचे माजी संचालक नेताजी पाटील, उदयसिंह पाटील कौलवकर, शेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अजित पवार, अशोक फराकटे, किरुळकर गुरुजी, शिक्षक समितीचे राज्य नेते उदय शिंदे, राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर, राज्य कार्याध्यक्ष सयाजी पाटील , उपाध्यक्ष राजन सावंत, पुण्याचे नंदू होळकर, दादा जांभवडेकर, मामा भोसले, शिक्षक समितीचे जिल्ह्याचे अध्यक्ष प्रमोद तौंदकर, सरचिटणीस प्रभाकर कमळकर, शिक्षक बँकेचे चेअरमन सुरेश कोळी, व्हाईस चेअरमन पद्मजा मेढे, संचालक अर्जुन पाटील, राजेंद्र पाटील, शिक्षक संघाचे बी एस पाटील, विलास चौगुले यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित सर्वच मान्यवरांनी पाटील यांना सदिच्छा दिल्या. याप्रसंगी पाटील यांच्या जीवनप्रवासावर आधारित गौरव अंक प्रकाशित केला.
सत्काराला उत्तर देताना पाटील म्हणाले, ‘आई-वडिलांच्या प्रामाणिकपणाचे संस्कार घेऊन निष्ठेने सेवा बजावली, प्रत्येक विद्यार्थ्याला घडविण्याचा प्रयत्न केला. सहकाऱ्यांशी मित्रत्वाने वागलो. शिक्षक संघटनेत चौदा-पंधरा वर्षे पडेल ते काम केलं, आणि जेव्हा संधी मिळाली तेव्हा नेतृत्वही केलं .शिक्षण शिक्षक आणि बालक यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढत राहिलो, प्रशासनाशी दोन हात केले. या सर्व प्रवासात अनेक माणसं मिळाली. त्या माणसांना जोडून ठेवलं नवी माणसं वाढवत गेलो आणि राज्यभरामध्ये माणसांचं एक समृद्ध जाळ निर्माण झाले. आपल्या या प्रेमाने गेली अनेक वर्ष जो संघर्ष करतो आहे ,कोणत्याही पदाची अपेक्षा न करता निस्पृह भावनेने लढतो आहे त्या माझ्या संघर्षाला आपण सर्वांनी आपल्या प्रेमाची पोहोच पावती दिली याबद्दल मी आपला सदैव ऋणी राहीन.
यानिमित्ताने गौरव समितीच्या सर्व कार्यकर्त्यांनी घेतलेले कष्ट,गौरवअंकाच्या निर्मितीसाठी केलेले परिश्रम हेही माझ्या नेहमीचं स्मरणात राहतील. सेवापूर्ती हे एक निमित्त आहे ,तो एक टप्पा आहे पण यापुढेही सार्वजनिक जीवनातील माझा प्रवास तुम्हा सर्वांच्या पाठिंब्याने, जेष्ठांच्या आशीर्वादाने अखंड सुरू राहील माझ्या या प्रवासात प्रत्येक वळणावर प्रत्येक चढ उतारावर आपल्या सर्वांची साथ आणि सोबत नक्कीच लागेल.’ या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक संदीप मगदूम यांनी केले.