संजय पवारांचा शिवसेना उपनेतेपदाचा राजीनामा ! राजीनामा मागे घेण्यासाठी कार्यकर्त्यांची घोषणाबाजी!!
schedule30 Jun 25 person by visibility 178 category

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : शिवसेना ठाकरे गटाच्या कोल्हापूर जिल्हाप्रमुख नियुक्तीवरून निर्माण झालेला वाद शमण्याऐवजी तो आणखी धुमसत आहे. पदाधिकारी निवड प्रक्रिया हा सर्वस्वी वरिष्ठांचा निर्णय असला तरी या प्रक्रियेत सामावून घेतले जात नाही, विश्वासात घेतले जात नाही ही मनाला जास्त बोचणारी बाब आहे . यामुळे मी शिवसेना उपनेते पदाचा राजीनामा देत असल्याचे शिवसेनेचे उपनेते संजय पवार यांनी कोल्हापुरात जाहीर केले. शिवसेना उपनेते पदाचा राजीनामा देत असलो तरी शिवसैनिक म्हणून मी आयुष्यभर उद्धव ठाकरे यांच्यासोबत काम करत राहणार शिवसेनेत असणार अशी भूमिका ही त्यांनी स्पष्ट केली.
कोल्हापूर शिवसेना जिल्हाप्रमुख पदी रवीकिरण इंगवले यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीवरून शिवसेनेअंतर्गत धुसफूस वाढली आहे. जिल्हाप्रमुख पदासाठी रविकिरण इंगवले यांच्यासह अवधूत साळोखे, हर्षल सुर्वे, राजू यादव, विराज पाटील हे इच्छुक होते. शिवसेनेच्या जिल्हा पातळीवरुन काही नावांची शिफारस करण्यात आली होती. मात्र यामध्ये रविकिरण इंगवले यांनी बाजी मारली. जिल्हाप्रमुख पदाच्या नव्या नियुक्तीवरून शिवसेनेमध्ये उघडपणे नाराजी नाट्य सुरू झाले आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख व उपनेते असलेल्या संजय पवार यांनीही, ज्या पद्धतीने निवड झाली त्या प्रक्रियेवर नाराजी व्यक्त करत सोमवारी भूमिका जाहीर करणार सांगितले होते. त्यानुसार सोमवारी 30 जून रोजी सर्किट हाऊस येथे शिवसेना कार्यकर्त्यांची बैठक झाली. या बैठकीत उपनेता म्हणून मी शिवसैनिकांना न्याय देऊ शकत नाही. ज्या निवडी झाल्या त्या प्रक्रियेत सामावून घेतले नाही. जिल्हाप्रमुख पदाच्या नियुक्ती संदर्भात विचारणा झाली नाही. उपनेते म्हणून मी जर कार्यकर्त्यांना न्याय देऊ शकत नसेल तर मी या पदाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी बैठकीत सांगितले. मात्र त्यांचा हा निर्णय अनेक कार्यकर्त्यांना रुचला नाही. त्यांनी घोषणाबाजी करत राजीनामा देऊ नका असे सांगितले. त्यानंतर संजय पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेमध्ये बोलताना पवार म्हणाले, 1989 पासून मी शिवसेनेत आहे. शहरप्रमुख, जिल्हाप्रमुख, नगरसेवक अशा विविध पदावर कामे केली. 1990, 1995 व 2010 मध्ये नगरसेवक म्हणून निवडून आलो. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे हे आमचे दैवत आहेत. मातोश्री हे आमचे मंदिर आहे. पक्षाने जो आदेश दिला त्यानुसार आपण काम केले. पक्षाचा आदेश अंतिम समजून आतापर्यंत काम करत आलो. मात्र गेल्या सात आठ महिन्यापासून वेगळेच राजकारण सुरू आहे. विधानसभेलाही कोल्हापूर उत्तर मधून मशाल चिन्हावर निवडणूक लढण्यासाठी माझ्यास आणखीन तिघे इच्छुक होते. मात्र पक्षाने आदेश दिला आम्ही सगळे महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचाराला सक्रिय झालो. पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मला अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या पदावर काम करण्याची संधी दिली. राज्यसभेसाठी उमेदवारी दिली. माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला मोठे पद दिले याचे मला कायम स्मरण आहे . मात्र जिल्हाप्रमुख नियुक्तीवरून ज्या काही घडामोडी घडल्या त्या सामान्य कार्यकर्त्यांना रुचणाऱ्या नव्हत्या. त्या पदावरील व्यक्तीची निवड पारदर्शक पद्धतीने व्हायला पाहिजे होती. शिवसेनेचे उपनेते म्हणून मी, सह संपर्कप्रमुख म्हणून विजय देवणे यांच्याशी चर्चा करायला पाहिजे होती मात्र या सगळ्या घडामोडीत आम्हाला कुठेही सामावून घेतले नाही. जिल्हाप्रमुख पदासाठी अनेक जण इच्छुक होते मात्र कोणालाही विचारात न घेता हा निर्णय झाला तो शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना रुचला नाही. त्यामुळे मी शिवसेना उपनेतेपदाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेमध्ये शिवसेनेचा उपनेते पदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा करतात काही कार्यकर्ते घोषणा देत त्या ठिकाणी आले आणि त्यांनी राजीनामा मागे घ्या. राजीनामा मागे घेतल्याशिवाय आम्ही इथून हटणार नाही अशी भूमिका घेतली शिवसेनेचे सह संपर्कप्रमुख विजय देवणे यांनीही पत्रकार परिषद सुरू होण्याअगोदर तुम्ही घेतलेला निर्णय शिवसैनिकांना मान्य होणार नाही असे सांगितले मात्र संजय पवार यांनी आपण गेले 36 वर्षे शिवसेनेत प्रामाणिकपणाने काम करत आहोत मात्र ज्या पद्धतीने या निवडी झाल्या ही प्रक्रिया मनाला त्रास देणारे आहे म्हणून उपनेते पदाचा राजीनामा देत असल्याचे स्पष्ट केले.संजय पवार यांची पत्रकार परिषद झाल्यानंतर सहसंपर्क विजय देवणे यांनी पत्रकार परिषद घेऊन संजय पवार यांनी राजीनामा मागे घ्यावा अशी मागणी केली शिवसेनेच्या सगळ्या कार्यकर्त्यांची भावना संजय पवार यांनी राजीनामा मागे घ्यावा अशी असल्याचे सांगितले शिवसेनेत तीन दशकांहून अधिक काळ सक्रिय असलेल्या पवार यांनी कार्यकर्त्यांची मोट बांधले आहे त्यांनी जर राजीनामा दिला तर त्या कार्यकर्त्यांनी कोणाकडे पाहायचे असा सवाल ही देवणे यांनी उपस्थित केला. दरम्यान कार्यकर्त्यांच्या घोषणेबाजीतच संजय पवार यांनी पत्रकार परिषद आटोपली त्यानंतर ते सभागृहातून बाहेर पडत असताना कार्यकर्त्यांच्या घोषणा सुरू होत्या. कार्यकर्त्याने त्यांच्याभोवती गराडा घातला. राजीनामे मागे घ्या अन्यथा आम्ही येथून जाणार नाही अशी भूमिका घेतली. त्यावर पवार यांनी मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे त्यामध्ये बदल होणार नाही. मी शिवसेना उपनेतेपदाचा राजीनामा दिला आहे मात्र शिवसैनिक म्हणून शेवटपर्यंत शिवसेनेसोबतच काम करीन असे सांगितले. पत्रकार परिषदेवेळी माजी जिल्हाप्रमुख रवी चौगुले अवधूत साळोखे , विराज पाटील, शशिकांत बिडकर धनाजी आमते, महेश साळोखे , दिनेश साळोखे, स्मिता मांढरे, माजी नगरसेविका प्रतिज्ञा उत्तुरे, बाजीराव पाटील आदी उपस्थित होते.