फुटबॉलपटूची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली, निखिल खाडेचे निधन
schedule30 Jun 25 person by visibility 109 categoryक्रीडा

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : निखिल दिलीप खाडे, कोल्हापुरातील तरुण फुटबॉलपटू. विविध संघाकडून खेळताना उत्कृष्ट गोलरक्षक म्हणून लौकिक मिळवला होता. दोन-अडीच वर्षापूर्वी ब्रेन ट्यूमरने आजाराने या तरुण खेळाडूला घेरले. त्याच्या मेंदूवर दोन शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्याच्या उपचारासाठी समाजातील अनेक घटकांनी हातभार लावला. त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना सोमवारी, ३० जून २०२५ रोजी या तरुण फुटबॉलपटूचे निधन झाले. गेली कित्येक महिने मृत्यूशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरली. खेळाडूच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.
मृ़त्यूसमयी ते ३४ वर्षाचे होते. पंचगंगा स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात वडील, दोन बहिणी, पत्नी, मुलगा असा परिवार आहे. निखिलची उत्कृष्ट गोलकीपर म्हणून ओळख होती. कोल्हापुरातील विविध संघाकडून फुटबॉल खेळले होते. वाघाची तालीम मंडळ फुटबॉल संघ, प्रक्टिस क्लब, शिवाजी तरुण मंडळ, फुलेवाडी फुटबॉल संघ, दिलबहार तालीम मंडळ फुटबॉल संघाकडून खेळताना उत्कृष्ट गोलरक्षक म्हणून छाप पाडली होती. प्रॅक्टिस क्लबमधून ते ए डिव्हिजन स्पर्धेत २००९-१० या वर्षात खेळले. २०१० ते २०१९ पर्यंत फुलेवाडी फुटबॉल संघाकडून प्रतिनिधीत्व केले. त्यानंतर दिलबहार तालीम फुटबॉल संघातून खेळ केला. २०२३ मध्ये ब्रेन ट्यूमरचा त्रास झाला. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. दोन वेळेला मेंदूच्या शस्त्रक्रिया झाल्या होत्या. मंत्री चंद्रकांत पाटील, डीवायपी ग्रुपमार्फत माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी निखिलच्या वैद्यकीय उपचारासाठी आर्थिक मदत केली होती. समाजातील अनेक घटकांनी मदतीचा हात दिला होता.