दसरा चौकात शनिवारी रंगणार उर्दू कार्निव्हल ! पुस्तक प्रदर्शन, फूड फेस्टिव्हल !
schedule07 Jan 25 person by visibility 161 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापुरात शनिवारी, (११ जानेवारी २०२५) उर्दू कानिव्हल आयोजित केला आहे. यामध्ये उर्दू शाळांच्या स्नेहसंमेलनासह पुस्तक प्रदर्शन, खाद्य पदार्थांचे स्टॉल असतील. दिवसभर होणाऱ्या या कॉर्निव्हलमध्ये तीन हजार मुलांचा सहभाग राहील अशी माहिती कार्निव्हलचे आयोजक गणी आजरेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. दसरा चौक मैदानावर सकाळी नऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत कार्निव्हल सुरू राहील.
उर्दू भाषेची ओळख व्हावी आणि कोल्हापूरच्या महापालिकेच्या व अन्य उर्दू शाळांमधील विद्यार्थ्यांच्या विविध गुणांचा विकास व्हावा हा उद्देश ठेवून कार्निव्हल भरविला आहे. सकाळी नऊ वाजल्यापासून कार्निव्हलला सुरुवात होईल. दरम्यान आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते व खासदार शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी चार वाजता उद्घाटनचा कार्यक्रम आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांची उपस्थिती असणार आहे. याप्रसंगी आमदार राजेश क्षीरसागर, आमदार अमल महाडिक, आमदार इद्रिस नायकवडी, शिक्षण संस्था चालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष शारंगधर देशमुख यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
कार्निव्हलमध्ये कोल्हापूर शहरातील मुस्लिम बोर्डिंग संचलित नेहरू हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज,अँग्लो उर्दू हायस्कूल,शिरोली, कोमनपा डॉ.झाकिरहुसेन उर्दू मराठी शाळा सुसरबाग कोल्हापूर,हाजी शाबाजखान आमीनखान जमादार उर्दू मराठी शाळा,जवाहर नगर कोल्हापूर,हाजी गफूर वंटमुरे उर्दू मराठी शाळा विक्रमनगर,मौलाना अबुल कलाम आझाद उर्दु हायस्कूल जवाहर नगर कोल्हापूर या शाळांचा समावेश आहे. ऊर्दू मराठी इंग्रजी भाषेचा इतिहास,ऊर्दू मुशायरा, ऊर्दू भाषेतील वाडमय मधील विविध प्रकाराचे सादरीकरण,स्नेहसंमेलन अंतर्गत देश भक्तीपर गीतांचे सादरीकरण करण्यात येणार आहे. प्रदर्शनात सर्वात छोट्या पवित्र कुराणाची प्रत,राजर्षी शाहू महाराजांनी मराठी भाषेत भाषांतरीत करून घेतलेल्या पवित्र कुराणाची प्रत,इसवी सन पूर्व नाण्यांचे प्रदर्शन आणि फूड फेस्टिव्हल सुद्धा आयोजित करण्यात आले आहे.
पत्रकार परिषदेला कादर मलबारी, समीर मुजावर, अबू ताकीलदार, रफिक शेख, बापू मुल्ला, राज महात, रहिम महात, मुख्याध्यापक शकील अहमद, यास्मिन पेटकर, रुखसाना पटेल, महमद इकबाल ताशिलदार, एस एस काझी, यु एच मुकादम, अब्दुल वाहिद सिद्दीकी आदी उपस्थित होते.