पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जेवर चालवण्यासाठी आराखडा बनवा-अमल महाडिकांच्या अधिकाऱ्यांना सूचना
schedule07 Jan 25 person by visibility 42 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : जिल्ह्यातील सर्व पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जेवर चालवण्यासाठी आराखडा तयार करा. यासंबंधी अभ्यास करून आराखडा बनवावा सरकारी स्तरावर निधीसाठी पाठपुरावा केला जाईल अशा सूचना आमदार अमल महाडिक यांनी जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना केल्या.
कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील २२ गावांमध्ये जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणीपुरवठा योजना राबवण्यात येत आहे. यातील चार गावांची योजना पूर्णत्वाला गेली असून उर्वरित अठरा गावांसाठी योजनेचे काम प्रगतीपथावर आहे. या अनुषंगाने आमदार महाडिक यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांच्यासमवेत विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीला महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, जल जीवन मिशन, एमआयडीसी, महावितरण तसेच जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
पुढील तीस वर्षांचा कार्यकाळ लक्षात घेऊन वाढत्या लोकसंख्येला स्वच्छ आणि मुबलत पाणीपुरवठा होईल यासाठी नियोजन करावे. एमआयडीसी कडून पाणीपुरवठा केल्या जाणाऱ्या गावांना वाढीव पाणी पुरवठ्यासाठी आवश्यक असल्यास प्रस्ताव सादर करावा. ज्या गावांमध्ये पाणी टाकी अथवा जलशुद्धीकरण केंद्राच्या जागे संदर्भात अडचणी आहेत त्या गावातील ग्रामसेवक आणि सरपंचांची बैठक घेऊन या अडचणीचे निराकरण करण्यात येईल असेही महाडिक म्हणाले. ग्रामस्थांना नळ जोडणी साठी कमीत कमी शुल्क आकारावे तसेच कणेरी येथे उभारण्यात येणाऱ्या जल शुद्धीकरण केंद्राचीही माहिती आमदार महाडिक यांनी घेतली.