औद्योगिक वीजग्राहकांसाठी अद्यावत स्वागत सेल, महावितरणकडून अधिक जलदगतीने सेवा !
schedule13 Aug 25 person by visibility 55 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : औद्योगिक ग्राहकांना जलद गतीने सेवा मिळण्यासाठी महावितरण जानेवारी २०२४ पासून स्वागत सेल संकल्पना राबवत आहे. या स्वागत सेलद्वारे औद्योगिक ग्राहकांना नवीन वीज जोडणी, वीज देयके, वीज पुरवठ्याच्या तक्रारी, भार वाढवणे व कमी करणे आदी सुविधा पुरवल्या जातात. कोल्हापूर मंडलाच्या ताराबाई पार्क कोल्हापूर येथील कार्यालयात स्वतंत्र व अद्यावत स्वागत सेल कक्षाचे उद्घाटन नुकतेच झाले.
यावेळी कोल्हापूर परिमंडल कार्यालयाचे मुख्य अभियंता स्वप्नील काटकर, कोल्हापूर मंडल कार्यालयाचे अधीक्षक अभियंता गणपत लटपटे, मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन कागल-हातकणंगलेचे अध्यक्ष मोहन कुशिरे, उपाध्यक्ष विठ्ठल पाटील, संचालक सत्यजित सावंत, सचिन कुलकर्णी, विशाल कामटे, खजिनदार अमृतराव यादव, शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन कोल्हापूरचे उपाध्यक्ष भारत जाधव, सचिव शेखर कुसाळे, गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष स्वरूप कदम, संचालक विनयकुमार चौगुले व कोल्हापूर इंजिनियर असोसिएशन उद्यमनगरचे अध्यक्ष कमलाकांत कुलकर्णी, उपाध्यक्ष श्रीकांत दुधाने, माजी अध्यक्ष बाबा कोंडेकर, सचिव प्रदीप वरांबळे, कुशल सामानी तसेच अरुण खोत, संजय वारके, गुरुनाथ पाटील, कार्यकारी अभियंते म्हसू मिसाळ, सुनील गवळी, अशोक जाधव, दत्तात्रय भणगे, वैभव गोंदील उपस्थित होते.
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात किंवा महावितरणच्या मंडलस्तरावर अधीक्षक अभियंता यांच्या अखत्यारित ‘स्वागत सेल’ कार्यान्वित आहे. या सेलचे प्रमुख म्हणून कार्यकारी अभियंता तसेच व्यवस्थापक किंवा उपव्यवस्थापक (वित्त व लेखा) यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. औद्योगिक ग्राहक त्यांच्या अडचण-तक्रारी नोंदवल्या नंतर महावितरण अधिकारी व कर्मचारी प्रत्यक्ष स्थळावर जाऊन या ग्राहकांना वीज सेवा देतात. औद्योगिक ग्राहकांकरिता ७८७५७६९०९० हा मोबाईल क्रमांक व swagatcell_kolhapur@mahadiscom.in हा ईमेल आयडी यापूर्वीच जाहीर करण्यात आला आहे. महावितरणकडे नवीन वीजजोडणी किंवा वाढीव वीजभारसंबंधी ‘स्वागत सेल’कडे मागणी नोंदविल्यानंतर संबंधित औद्योगिक ग्राहकांशी संपर्क साधून आवश्यक कागदपत्रे, शुल्क आदींची माहिती दिली जाते.