कोल्हापुरात बुधवारी संघ गंगा के तीन भगीरथ नाटकाचा प्रयोग, आरएसएसची वाटचाल उलगडणार
schedule04 Aug 25 person by visibility 24 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त बुधवारी सहा ऑगस्ट 2025 रोजी कोल्हापुरात 'संघ गंगा के तीन भगीरथ' या हिंदी नाटकाच्या प्रयोगाचे सादरीकरण होणार आहे. पेटाळा येथील राम गणेश गडकरी हॉलमध्ये सायंकाळी साडेसहा वाजता या नाट्यप्रयोगाचे आयोजन केले आहे अशी माहिती भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सचिव महेश जाधव, भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव व प्रदेश कार्यकारिणी सदस्य राहुल चिकोडे यांनी दिली. डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी 1925 मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यंदा शताब्दी वर्ष साजरे करत आहे. या निमित्ताने डॉक्टर हेडगेवार, दुसरे सरसंचालक माधव गोळवलकर आणि बाळासाहेब देवरस या तिघांनी संघाच्या वाटचालीसाठी जे अभूतपूर्व योगदान दिले ते नाटकातून मांडण्यात येणार आहे. रवींद्र भुसारी यांच्या मार्गदर्शनाखाली या नाटकाचे प्रयोग होत आहेत. या हिंदी नाटकाचे लेखन श्रीधर गाडगे यांनी केले आहे तर संजय पेंडसे यांनी दिग्दर्शक केले आहे. या नाटकाची निर्मिती सारिका पेंडसे यांनी केली आहे. हे नाटक मोफत आयोजित केले आहे. या नाटकाचे देशभर प्रयोग होत आहेत. नाटक पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे. पत्रकार परिषदेवेळी भाजपचे हेमंत आराध्ये, विजय अग्रवाल आदी उपस्थित होते.