शारंग चषक फुटबॉल स्पर्धेला प्रारंभ, वेताळमाळ तालीम मंडळाची विजयी सलामी
schedule14 May 25 person by visibility 36 categoryक्रीडा

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : नेताजी तरुण मंडळ आयोजित शारंग चषक फुटबॉल स्पर्धेला मंगळवारपासून (१३ मे २०२५) सुरुवात झाली. उद्घाटनच्या सामन्यात वेताळमाळ तालीम मंडळने पाटाकडील तालीम मंडळ ब संघावर तीन विरुद्ध एक अशा गोलफरकाने विजयी सलामी दिली. या सामन्यात वेताळमाळ तालीमचा खेळाडू आकाश माळीने दोन गोल केले. येथील शाहू स्टडेडियम येथे स्पर्धा होत आहे.
स्थायी समितीचे माजी सभापती शारंगधर देशमुख यांच्या पुढाकारातून स्पर्धेचे आयोजन केले. ‘वसंतराव जयवंतराव देशमुख ’यांच्या स्मरणार्थ ‘शारंग चषक फुटबॉल स्पर्धा’भरविली आहे. स्पर्धेचे उद्घाटन निवृत्त मेजर जनरल ए. बी. सय्यद यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी स्थायी समितीचे माजी सभापती देशमुख, सूरज देशमुख, लालबागचा राजा गणेशमूर्तीचे पुजारी वेदांत पुजारी, नेताजी तरुण मंडळाचे अध्यक्ष राजू साळोखे, सिद्धार्थ देशमुख, आशपाक आजरेकर, गुरुनाथ जोशी,किरण पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.
उद्घाटनचा सामना वेताळमाळ तालीम मंडळ विरुद्ध पीटीएम ब या संघादरम्यान झाला. या सामन्यात वेताळमाळ तालीम मंडळ संघाचा खेळ चमकदार झाला. मणिकंदन, सचिन तेलंग, आकाश माळी, प्रणव कणसे, ब्रह्मा यांनी चांगला खेळ करत लक्ष वेधले. सामन्याच्या नवव्या मिनिटाला आकाश माळीने गोल करत संघाला एक विरुद्ध शून्य अशी आघाडी मिळवून दिली. या गोलची परतफेड करुन सामन्यात बरोबरी साधण्यासाठी पीटीएमच्या खेळाडूंनी शर्थीचे प्रयत्न केले. पीटीएमच्या ओंकार देवणे, मुद्दसर शेख, हेमंत वस्ताद, यश मुळीक, साहिल भोसले यांचा खेळ फुटबॉलशौकिनांकडून दाद मिळवणारा ठरला. पूर्वार्धात वेताळमाळ तालीम मंडळ संघाकडे एका गोलची आघाडी कायम होती.
उत्तरार्धातही वेताळमाळ तालीमच्या खेळाडूंनी जोरदार खेळ केला. सामन्याच्या ६६ व्या मिनिटाला वेताळमाळ संघाकडून मणिकंदने गोल नोंदविला. संघाची आघाडी दोन विरुद्ध शून्य अशी झाली. आघाडी कमी करण्यासाठी पीटीएमच्या खेळाडू सरसावले. सामन्याच्या ७३ व्या मिनिटाला पीटीएमच्या खेळाडूंना गोल करण्यात यश आले. रोहित देवणेने गोल करत आघाडी कमी केली. या गोलच्या दुसऱ्याच मिनिटाला वेताळमाळ तालीम संघाच्या खेळाडूंनी आक्रमक खेळ करत गोल नोंदविला. आणि संघाला तीन विरुद्ध एक अशी आघाडी वाढविली. वेताळमाळकडून तिसरा गोल आकाश माळीने केला.