Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
शाळेच्या पहिल्याच दिवशी तीन लाख विद्यार्थ्यांना नवीन पुस्तके ! जिल्ह्यात १७ लाखहून अधिक  पाठ्यपुस्तकांचे वितरण !!शुभेच्छासाठी नकोत हार-बुके-शाल-फेटा ! जमा करा सैनिक कल्याण निधीसाठी रक्कम !!गोकुळमध्ये सत्ताधारी आघाडीत बिघाडी ? अरुण डोंगळे बंडखोरीच्या पावित्र्यात, चेअरमनपदाचा राजीनामा नाही !!शारंग चषक फुटबॉल स्पर्धेला प्रारंभ, वेताळमाळ तालीम मंडळाची विजयी सलामीडीवाय पाटील विद्यानिकेतनचा दहावी सीबीएसईचा निकाल शंभर टक्केकेआयटीच्या माजी विद्यार्थी संघाचा अनोखा मैत्रभाव ! हयात नसलेल्या वर्गमित्रांच्या नावांनी अॅवार्डची घोषणा !!दहावी - बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी बौद्धिक क्षमता चाचणीचे आयोजनहसन मुश्रीफांच्या उपस्थितीत शनिवारी शहर राष्ट्रवादीचा कोल्हापुरात मेळावा कोरगावकर हायस्कूलच्या सुहानाचे दहावी परीक्षेत उल्लेखनीय यश भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी नाथाजी पाटील, राजवर्धन निंबाळकर यांची फेरनिवड ! कोल्हापूर महानगर वेटिंगवर !!

जाहिरात

 

गोकुळमध्ये सत्ताधारी आघाडीत बिघाडी ? अरुण डोंगळे बंडखोरीच्या पावित्र्यात, चेअरमनपदाचा राजीनामा नाही !!

schedule14 May 25 person by visibility 417 categoryराजकीय

 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : जिल्ह्यातील प्रमुख सत्ता केंद्र आणि आर्थिक केंद्र आणि सत्ता केंद्र मानल्या जाणाऱ्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीला अजून एक वर्षाचा कालावधी असतानाच सत्ताधारी आघाडीमध्ये बिघाडीला सुरुवात झाली आहे. सत्ताधारी नेतेमंडळींच्याकडून चेअरमन बदलाच्या हालचाली सुरू असताना विद्यमान चेअरमन अरुण डोंगळे यांनी राजीनामा द्यायचा नाही असा आक्रमक पवित्रा घेतला आहे. डोंगळे हे गेले काही दिवस मुंबईत आहेत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे या भेटीदरम्यान डोंगळे यांनी चेअरमन पदाचा राजीनामा देऊ नये असे स्पष्टपणे सांगितल्याचे वृत्त आहे. दुसरीकडे गोकुळच्या संचालकांची 15 मे रोजी बैठक होत आहे. या बैठकीत डोंगळे यांनी राजीनामा सादर करावा अशा सूचना  गोकुळचे सत्ताधारी आघाडीचे नेते व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील व वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते हसनमुश्रीफ यांनी दिल्या होत्या. मात्र डोंगळे यांनी राजीनामा नाही असा पवित्रा घेतल्याने गोकुळच्या सत्ताधारी नेत्यांना धक्का मानला जात आहे. गुरुवारी दुपारी यासंबंधीचे चित्र स्पष्ट होईल.
 गेली चार वर्षे गोकुळ मध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांचे वर्चस्व होते. आता मात्र डोंगळे यांनी बंडाचा पवित्रा घेतल्यामुळे गोकुळमध्ये महायुतीची सत्ता येण्याची चिन्हे दिसत आहेत. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये गोकुळचे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील व अरुण डोंगळे यांना सोबतीला घेत आमदार सतेज पाटील व मंत्री मुश्रीफ यांनी गोकुळ मध्ये सत्ता परिवर्तन घडवले होते. गोकुळच्या सत्तेच्या राजकारणात विश्वास पाटील व अरुण डोंगळे यांची भूमिका ही नेहमी निर्णायक ठरत आली आहे. गेल्या निवडणुकीत ही त्याची प्रचिती आली. गोकुळमध्ये सत्ता परिवर्तन झाल्यानंतर पहिली दोन वर्षे संघाचे चेअरमनपद विश्वास पाटील यांना तर त्यानंतरची दोन वर्षे अरुण डोंगळे यांना मिळाली. डोंगळे यांच्या चेअरमन पदाची मुदत 25 मे 2025 रोजी संपत आहे. दरम्यान गोकुळच्या संचालक मंडळाची 15 मे रोजी बैठक होत आहे. पुढील वर्षी गोकुळची निवडणूक होणार आहे. सध्याच्या कार्यकारणीच्या शेवटच्या वर्षांमध्ये गोकुळचे चेअरमन पद सत्ताधारी आघाडीचे नेते व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्या गटाला देण्यासाठी हालचाली सुरू होत्या. आमदार सतेज पाटील यांचे कट्टर समर्थक व गोकुळचे संचालक बाबासाहेब चौगुले यांच्या नावाची चेअरमन पदासाठी चर्चा होती.
 दुसरीकडे गोकुळमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी महायुतीकडूनही प्रयत्न सुरू होते. विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे खासदार धनंजय महाडिक यांनी तीन महिन्यांमध्ये गोकुळमध्ये सत्तांतर होईल असे स्पष्टपणे सांगितले होते. तर गोकुळमधील सत्ताधारी आघाडीचे नेते व सध्या महायुतीमध्ये मंत्री असलेले हसन मुश्रीफ यांनी सहकारात पक्षीय राजकारण नको अशी भूमिका घेतली होती.  

गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे हे लोकसभा व विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या बाजूने होते. विधानसभा निवडणुकीत त्यांनी राधानगरी भुदरगड मध्ये शिवसेनेचे उमेदवार प्रकाश आबिटकर यांचा तर करवीरमध्ये चंद्रदीप नरके यांचा प्रचार केला होता. विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या कालावधीत शिवसेनेचे नेते व तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंगळे यांना विधानसभेतील मदतीबद्दल बक्षीस देण्याचे ही ग्वाही दिली होती. डोंगळे यांना विधान परिषद किंवा महामंडळ दिले जाईल असेही म्हटले जाते.
दरम्यान चेअरमनपदाची मुदत संपत आल्यामुळे डोंगळे हे राजीनामा देणार की त्या पदावर राहणार याविषयी उत्कंठा वाढली आहे. गेले काही दिवस डोंगळे हे मुंबईत आहेत. त्यांनी या दौऱ्यात मुख्यमंत्री फडणवीस व उपमुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतल्याचे वृत्त आहे. मुंबई दौऱ्यात डोंगळे यांना चेअरमनपदाचा राजीनामा देऊ नका असे स्पष्टपणे सांगण्यात आल्याचे वृत्त आहे. यामुळे 15 मे रोजी होणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीत डोंगळे हे राजीनामा देणार नाहीत इथपर्यंत निर्णय झाला आहे. डोंगळे यांची ही भूमिका गोकुळ सत्ताधारी नेत्यांना मोठा धक्का आहे. डोंगळे यांच्या या खेळीमुळे गोकुळमध्ये नवीन राजकारणाला सुरुवात झाली आहे. गोकुळमधील या घटना जिल्ह्याच्या राजकारणाला ही कलाटणी देणाऱ्या ठरणार आहेत. सध्या डोंगळे यांची उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याशी जवळीक वाढले आहे. तसेच ते पालकमंत्री आबिटकर यांचेही निकटवर्तीय मानले जात आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes