कोरगावकर हायस्कूलच्या सुहानाचे दहावी परीक्षेत उल्लेखनीय यश
schedule13 May 25 person by visibility 18 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोरगावकर हायस्कूलच्या सुहाना रफिक शेख हिने शालांत परीक्षेत ८४ टक्के गुण मिळवले. दैनंदिन जीवनात रिक्षा चालवणे हाच तिच्या वडिलांचा व्यवसाय मात्र या व्यवसायामध्ये आर्थिक गणित गरजेपेक्षा वजाबाकीचे अधिक असल्याकारणाने साईड बिजनेस म्हणून तिच्या वडिलांनी पंचक्रोशीतील गावांमध्ये जत्रा आणि यात्रा यामध्ये खेळण्याचा व्यवसाय पत्करला. एकट्याला विक्री व्यवसाय करणे आणि त्यावर नियंत्रण करणे यासाठी सुहानाची मदत असायची बऱ्याचदा यासाठी तिची शाळाही चुकायची.
आपल्या व्यवसायामुळे तिची शाळा चुकते याची तिच्या वडिलांनाही खंत असायची. बरेचदा वडील याबाबत शाळेमध्ये आपल्या भावना व्यक्त करत असत . आपला बुडलेला अभ्यास सुहाना ज्या ठिकाणी जत्रेमध्ये थांबा असे त्या ठिकाणी दहावीचे पुस्तक घेऊन बसायची. मैत्रिणींना विचारून शाळेतला अभ्यास पूर्ण करायची. सुहाना केवळ अभ्यासातच नव्हे तर ॲथलेटिक्स या क्रीडा प्रकारात तिचे नैपुण्य आहे. या क्रीडा प्रकारातील ग्रेसमार्कही तिला मिळालेले आहेत शाळेतील सांस्कृतिक विभाग सुहानाशिवाय पूर्ण होत नाही. गाणी वक्तृत्व एकपात्री प्रयोग यामध्येही तिचे वेगळे वैशिष्ट्य होय. कोरगांवकर हायस्कूलचे मुख्याध्यापक संजय सौंदलगे, पर्यवेक्षिका प्रमिला साजणे, सुरेखा पोवार वर्गशिक्षिका हेमलता पाटील आणि सर्वच विषय शिक्षकांनी सुहानाचे कौतुक केले. कोरगांवकर हायस्कूलचा निकाल ९४ .४४ इतका लागला आहे .