शुभेच्छासाठी नकोत हार-बुके-शाल-फेटा ! जमा करा सैनिक कल्याण निधीसाठी रक्कम !!
schedule14 May 25 person by visibility 26 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : नवीन निवडी असोत की निवडणुकीतील विजय, शुभेच्छा देण्यासाठी हमखास हार, बुके, शाल आणि फेटा ठरलेलं. या आनंदाच्या क्षणी सगळेज जण वेगवेगळया माध्यमातून सहभागी होतात. राजकीय क्षेत्रातील व्यक्तीची जर एखाद्या पदावर निवड झाली की, शुभेच्छा द्यायला गर्दी उसळते. आणि आपसूकच हार, बुके, शाल आणि फेटा ही ठरलेले. नेमक्या याच बाबींना फाटा देत भारतीय जनता पक्षाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष नाथाजी तुकाराम पाटील यांनी शुभेच्छा द्यायला येणाऱ्या सर्वांनी कोणत्याही स्वरूपाचे हार,बुके, पुष्पगुच्छ, फेटा, अथवा शाल घेऊन येऊ नयेत. त्याएवजी त्याची रक्कम सैनिक कल्याण निधीकडे जमा करण्यासाठी द्यावी असे आवाहन केले आहे. शुभेच्छा समारंभालाही सामाजिक किनार देत त्यांनी वेगळेपण जपले आहे.
नाथाजी पाटील यांची भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी निवड झाली. त्यांना सलग दुसऱ्यांदा ग्रामीण जिल्हाध्यक्षपद मिळाले होते. यापूर्वी जुलै २२३ मध्ये त्यांची जिल्हाध्यक्षपदी निवड झाली होती. पाटील हे भुदरगड तालुक्यातील आकुर्डे येथील. गेली तीस वर्षे भाजपात कार्यरत आहेत. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून विद्यार्थी चळवळीपासून ते सक्रिय आहेत. भाजपा शाखाध्यक्ष, तालुका सरचिटणीस, तालुकाध्यक्ष, जिल्हा सरचिटणीस, उपाध्यक्ष ते सलग दोन वेळा अध्यक्ष अशी चढती कमान. ते दूधगंगा वेदंगा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक आहेत. शेती उत्पन्न बाजार समितीचे संचालक, संजय गांधी निराधार योजना समितीचे माजी अध्यक्ष म्हणून काम केले आहे. आकुर्डे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आहेत. त्रिमूर्ती संस्था समूहाच्या माध्यमातून विकास सेवा संस्था, दूध संस्था, वाचनालय स्वयंरोजगार संस्था स्थापन केली आहे.
मंगळवारी, १३ मे रोजी २०२५ रोजी त्यांची भाजप जिल्हाध्यक्षपदी पुन्हा निवड झाली. यानिवडीचे अनेकांनी स्वागत केले. प्रत्यक्ष भेटून अभिनंदन केले. अनेकजण हार, बुके देत सदिच्छा व्यक्त केल्या. दरम्यान पाटील यांनी या सदिच्छा उपक्रमाला सामाजिक संदर्भ दिला. त्यांनी म्हटले आहे, ‘मला शुभेच्छा द्यायला येणाऱ्या सर्वांनी कोणत्याही स्वरूपाचे हार,बुके, पुष्पगुच्छ, फेटा, अथवा शाल घेऊन येऊ नये. त्याऐवजी संबंधित रक्कम भाजपा कार्यालयात ठेवलेल्या बॉक्समध्ये जमा करावी. जमा झालेली रक्कम सैनिक कल्याण निधीकडे जमा केली जाईल.’असे आवाहन केले. त्यांच्या आवाहनाला नागरिकांकडून प्रतिसाद मिळत आहे.