दहावी - बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी बौद्धिक क्षमता चाचणीचे आयोजन
schedule14 May 25 person by visibility 24 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : दहावी आणि बारावीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी समिधा प्रतिष्ठान व योगदान फाउंडेशन कोल्हापूरतर्फे पुढील अभ्यासक्रमांची दिशा ठरवण्यासाठी विद्यार्थ्यांच्या मनोमापन चाचणीचे आयोजन केले आहे.विद्यार्थ्यांनी या चाचणीचा अधिकाधिक लाभ घ्यावा असे आवाहन समिधा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजित ठाणेकर आणि योगदान फाउंडेशनचे अध्यक्ष विजयसिंह खाडे पाटील यांनी केले आहे. विद्यार्थ्यांच्या अभियोग्यता किंवा संज्ञात्मक क्षमता, व्यक्तीमत्व आणि वर्तणूक, भावनिक बुद्धिमत्ता यांची चाचणी करणे व त्यानुसार त्यास दिशा देणे गरजेचे असते. व्यावसायिक स्तरावर अनेक व्यक्ती व संस्था अशा चाचण्या आयोजित करत असतात परंतु अनेक विद्यार्थ्यांना व पालकांना याची माहिती नसते आणि कधीकधी परिस्थिती नसते. अशा विद्यार्थ्यांसाठी, समिधा प्रतिष्ठान व योगदान फाउंडेशनतर्फे यंदा निशुल्कपणे या उपक्रमाचे आयोजन केले आहे. बारावी उत्तीर्ण झालेल्या सर्व शाखेतील विद्यार्थ्यांसाठी सोमवारी 19 मे 2025 मे रोजी व दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी 26 मे 2025 रोजी सकाळी प्रायव्हेट हायस्कूल येथे या विषयातील तज्ञ प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली चाचणी होणार आहेत. या चाचणीचा अधिकाधिक विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.