शिक्षक - संस्था चालकांनी उगारली आंदोलनाची छडी ! अन्यायी संच मान्यतेच्या विरोधात कोल्हापुरात जंगी मोर्चा !!
schedule11 Jul 25 person by visibility 776 category

!महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : " अन्यायी संच मान्यतेचा आदेश रद्द करावा, जुनी पेन्शन योजना लागू करावी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी भरतीचे अधिकार पूर्वीप्रमाणे संस्था चालकांना द्यावेत" यासाठी कोल्हापुरात शुक्रवारी जंगी मोर्चा काढण्यात आला. शिक्षकेतर कर्मचारी, शिक्षक मुख्याध्यापक प्राचार्य व संस्थाचालक सारे घटक या मोर्चात उतरल्यामुळे संच मान्यतेच्या निर्णयाच्या विरोधात संघटित शक्तीचे दर्शन घडले. या आंदोलनात आजी-माजी आमदारासह, मुख्याध्यापक संघ विविध शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी सहभाग घेतला. आंदोलनात महिला शिक्षकांची संख्या लक्षणीय होती. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना शिष्टमंडळातर्फे निवेदन देण्यात आले.
आमदार जयंत आसगावकर, माजी आमदार भगवानराव साळुंखे, विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, सीईओ कौस्तुभ गावडे, कोल्हापूर विभागाचे प्रमुख श्रीराम साळुंखे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक भैया माने, कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष एस डी लाड, शिक्षक नेते भरत रसाळे, दादासाहेब लाड, खंडेराव जगदाळे, बाबा पाटील, मुख्याध्यापक संघाचे चेअरमन राहुल पोवार, सचिव आर वाय पाटील, उपाध्यक्ष रवींद्र मोरे, महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष प्राचार्य दत्तात्रय घुगरे, विलास पोवार, कोल्हापूर जिल्हा संस्थाचालक संघाचे अध्यक्ष शारंगधर देशमुख, अतुल जोशी, महानगरपालिका प्राथमिक शिक्षक समितीचे सुधाकर सावंत, उमेश देसाई , वडगाव बाजार समितीचे सुरेश पाटील आदींच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. अन्यायकारक संच मान्यतेचा आदेश सरकारने रद्द करावा, जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागण्या सरकार दरबारी कळवाव्यात असे आवाहन यावेळी करण्यात आले.
तत्पूर्वी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास दसरा चौक येथील राजश्री शाहू महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून मोर्चाला प्रारंभ झाला. " जुनी पेन्शन योजना लागू झाली पाहिजे, पेन्शन आमच्या हक्काची, अन्यायकारक संचमान्य आदेश रद्द करा, शिक्षक व शिक्षकेतर भरतीचे अधिकार संस्था चालकांना मिळावेत, शिक्षक एकजुटीचा विजय असो, हम सब एक है" अशा घोषणा देत मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मार्गस्थ झाला. दसरा चौक, जयंतीला पूल, खानविलकर बंगला मार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय धडकला. या ठिकाणी जोरदार घोषणा देण्यात आल्या. जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील चौकात मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यावेळी विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची भाषणे झाली. सरकारने चुकीची शैक्षणिक धोरणे राबवू नयेत. मार्च 2024 मधील संच मान्यतेचा आदेश हा अन्यायकारक आहे यामुळे अनेक शाळा शून्य शिक्षकी होणार आहेत शिक्षकांना अतिरिक्त व्हावे लागणार आहे शाळा बंद होण्याचा धोका आहे. तेव्हा सरकारने संच मान्यतेचा अन्यायकारक आदेश रद्द करावा. जुनी पेन्शन योजना लागू करावी अन्यथा आंदोलनाची व्याप्ती वाढविण्यात येईल असा इशारा शिक्षण क्षेत्रातील विविध संघटनेच्या नेते मंडळींनी दिला. या आंदोलनामध्ये शिक्षक नेते राजाराम वरुटे, प्राचार्य प्रभाकर हेरवाडे, माजी मुख्याध्यापक आर डी पाटील, सी. एम गायकवाड, कोल्हापूर जिल्हा शिक्षक परिषदेचे विष्णू पाटील, उदय पाटील, के के पाटील, मुख्याध्यापक संघाचे माजी चेअरमन के बी पोवार, बी.जी काटे, अनिल चव्हाण, सयाजी पाटील, संजय सौंदलगे, कास्ट्राईब संघटनेचे राजेंद्र कांबळे यांच्यासह शिक्षकांची संख्या लक्षणीय होती.