तेरा वर्षाखालील मुला-मुलींची राज्य निवड बुद्धिबळ स्पर्धा उत्साहात, शनिवारी बक्षीस समारंभ
schedule23 Aug 25 person by visibility 82 categoryक्रीडा

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : चेस असोसिएशन कोल्हापूरने ब्राह्मण सभा करवीरच्या सहकार्याने आयोजित केलेल्या ॲड.पी आर मुंडरगी स्मृती एचटूई तेरा वर्षाखालील मुला मुलींच्या महाराष्ट्र राज्य निवड बुद्धिबळ स्पर्धा मोठा उत्साहात प्रारंभ झाल्या.मुंबई, पुणे,ठाणे,नागपूर, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, चंद्रपूर हिंगोली, अमरावती, पालघर, सोलापूर, सांगली, सातारा, परभणी, बीड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, धुळे, जळगाव, लातूर,धाराशिव, गोंदिया, बुलढाणा व स्थानिक कोल्हापूर येथील नामांकित २२० बुद्धिबळपटू सहभागी झाले. क्लासिकल बुद्धिबळाचे आंतरराष्ट्रीय नियमानुसार स्विस लीग पद्धतीने एकूण आठ फेऱ्यात ही स्पर्धा शनिवार 23 ऑगस्टपर्यंत चालणार आहे.
या स्पर्धेचे उद्घाटन कोल्हापूर विभागाचे क्रीडा व युवक सेवा उपसंचालक मा.सुहास पाटील, जिल्हा क्रीडाधिकारी कोल्हापूरविद्या शिरस, महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे सचिव निरंजन गोडबोले व ब्राह्मण सभा करवीर मंगलधामचे उपाध्यक्ष डॉक्टर दीपक आंबर्डेकर यांच्या हस्ते बुद्धिबळाच्या पटावर चाल करून झाली. यावेळी कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष प्राध्यापक अरुण मराठे, चेस असोसिएशन कोल्हापूरचे अध्यक्ष भरत चौगुले, पंचगंगा को-ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष रामचंद्र टोपकर, मंगलधामचे श्रीकांत लिमये, चेस असोसिएशन कोल्हापूरचे उपाध्यक्ष धीरज वैद्य, सचिव मनीष मारुलकर, या स्पर्धेचे मुख्य आंतरराष्ट्रीय पंच सांगलीच्या पौर्णिमा उपळावीकर व राष्ट्रीय पंच आरती मोदी, करण परीट, उत्कर्ष लोमटे, कॅंडिडेट मास्टर अनिश गांधी, आंतरराष्ट्रीय मास्टर सम्मेद शेटे, वरिष्ठ राष्ट्रीय पंच रवींद्र निकम व रोहित पोळ व प्रशांत पिसे व्यासपीठावर उपस्थित होते. चेस असोसिएशन कोल्हापूरचे अध्यक्ष भरत चौगुले यांनी स्वागत केले. सांगलीचे वरिष्ठ राष्ट्रीय पंच विजय माने यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.