तर राहुल पाटील अन् चंद्रदीप नरके हे मित्रही असतील-मंत्री हसन मुश्रीफ
schedule22 Aug 25 person by visibility 214 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘विधानसभा निवडणुकीला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तीन जागा वाढणार आहेत. कदाचित मतदार संघाची विभागणी झाली तर राहुल पाटील आणि चंद्रदीप नरके हे मित्रही असतील. आपला गट टिकवण्यासाठी सगळ्यांकडूनच अशी वक्तव्ये होत असतात.’अशा शब्दांत वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी सारवासारव केली.
दिवंगत आमदार पी. एन पाटील यांचे पुत्र व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राजेश पाटील हे आपल्या गटासह २५ ऑगस्ट २०२५ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. या पार्श्वभूमीवर राहुल पाटील यांनी पत्रकार परिषदेत बोलताना, करवीरमध्ये आम्ही पीएन गट म्हणूनच लढणार आहोत. चंद्रदीप नरके यांच्याशी विरोध कायम राहील. २०२९ मधील विधानसभेला मी त्यांच्या विरोधात उमेदवार असेन’असे वक्तव्य केले होते. यासंदर्भात पत्रकारांनी, मंत्री मुश्रीफांकडे विचारणा केली असता ते बोलत होते.
पत्रकारांशी बोलताना मुश्रीफ म्हणाले,‘ राहुल पाटील यासारख्या शक्तीमान माणसांच्या पक्षप्रवेशाने करवीरसह जिल्हयात राष्ट्रवादी पक्षाची राजकीय ताकद वाढली आहे. संपूर्ण हयातभर कै. पी. एन. पाटील यांनी कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेस पक्ष जीवंत ठेवण्यासाठी इमाने-इतबारे पक्षाची सेवा केली. आता त्यांची मुले भवितव्याचा विचार करून अन्य पक्षात प्रवेश करत आहेत. त्यांना सहकार्य करता येणार नसेल तर अपशकुन करून अडथळा आणू नयेत. त्यांना आशीर्वाद द्यावेत, अशी विनंतीही मंञी मुश्रीफ यांनी आमदार सतेज पाटील यांना केली. १५ आँगस्ट रोजी शेताशिवारात ध्वजारोहण करण्यासाठी आणि खर्डा भाकर खाण्यासाठी सतेज पाटील यांनी नितीन राऊत यांनाही बोलवायला हवे होते, अशीही कोपरखळी मंत्री मुश्रीफ यांनी लगावली.
गोकुळ दूध संघाच्या जाजम आणि घड्याळ वाटपाच्या आरोपाबद्दल मुश्रीफ म्हणाले, ‘संघाने यापूर्वीच योग्य तो खुलासा केलेला आहे. आम्ही जी- जी आश्वासने दूध उत्पादकांना दिली आहेत, ती पूर्ण केली आहेत. दूध खरेदी दरवाढ दोन रुपये देण्याचे वचन दिले होते. तिथे बारा रुपये दरवाढ दिली. भविष्यात हा दूध संघ फार मोठा होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून शहरातील रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करु. हे काम पावसाळा झाल्यानंतर मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करु.’