शौमिका महाडिक लढल्या, महायुतीचा धर्मही पाळला अन् सभासदांसोबतही राहिल्या !!
schedule10 Sep 25 person by visibility 619 categoryराजकीय

आप्पासाहेब माळी, महाराष्ट्र न्यूज वन : गोकुळच्या सर्वसाधारण सभेत गेली चार वर्षे सत्ताधाऱ्यांना आव्हान देणाऱ्या विरोधी आघाडीच्या संचालिका शौमिक महाडिक यंदा काय करणार ? त्या सभासदांसोबत राहणार की, संचालकांसोबत व्यासपीठावर बसणार ?. मागील चार वर्षाप्रमाणे त्यांच्या आक्रमकणाची धार कायम राहणार का ? हा प्रश्न सर्वाधिक चर्चेचा होता. कारण गोकुळचा अध्यक्ष हा महायुतीचा. यामुळे त्यांच्या भूमिकेकडे लक्ष होते. मात्र महाडिक यांनी महायुतीचा धर्म पाळला, त्याचवेळी संचालक वाढीचा मुद्दा, गोकुळच्या संचालक मिटिंगवरील वाढलेला खर्च, अभ्यास दौऱ्यावरील खर्चाने गाठलेला ५६ लाखाचा आकडा यावरुन त्या पूर्वीसारख्याच लढल्या. यंदा आक्रमणाची धार कमी असली तर लढवय्या बाणा तोच होता. सभेच्या कालावधीत व्यासपीठावर न जाता, दूध उत्पादकांसोबत मंडपात बसल्या. आणि गोकुळमध्ये आपण दूध उत्पादकासोबत असल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिले.
गोकुळच्या गत निवडणुकीत सत्तांतर झाले. मंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलला १७ जागा मिळाल्या. महाडिक-पी. एन. पाटील गटाला चार जागा मिळाल्या. विरोधी आघाडीतून शौमिका महाडिक, अंबरिश घाटगे, बाळासाहेब खाडे, चेतन नरके हे निवडून आले. गोकुळची निवडणूक झाली तेव्हा राज्यात महाविकास आघाडीची सत्ता होती. सत्तांतरानंतरची काही महिने उलटल्यानंतर महाडिक यांनी गोकुळच्या कारभारावर बोट ठेवण्यास सुरुवात केली. पहिल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत त्या आक्रमक झाल्या. विरोधी आघाडीतून निवडून आलेले अन्य तीन सदस्यांनी सत्ताधाऱ्यांशी मिळतेजुळते घेतले. महाडिक मात्र एकटया लढत राहिल्या. कधी पत्रकार परिषद घेत तर कधी गोकुळच्या सभेत त्यांनी चुकीच्या कामकाजावर प्रहार केले. महाडिक गटाची पूर्ण रसद त्यांच्या पाठीशी. वार्षिक सभेत त्या सत्ताधारी नेत्यांना आव्हान देऊ लागल्या. सभासदांशी निगडीत प्रश्न मांडल्यामुळे दूध उत्पादकही सोबत. शिवाय यामुळे सर्वसाधारण सभेत त्यांच्यावर कायम फोकस राहिला.
राज्यातील सत्ताकारणाची समीकरणे बदलली. महायुती आकाराला आली. मे २०२५ मध्ये तर गोकुळमध्ये महायुतीचा अध्यक्ष करण्याचे खेळी झाली. ज्यांच्या विरोधात लढायचे त्यांच्यासोबत गोकुळमध्ये काम करायचे. महायुती म्हणून धर्म पाळायचा. त्याचवेळी गोकुळमधील चुकीच्या कामकाजाविरोधात पूर्वीसारखाच लढवय्या बाणा कायम ठेवून वेगळे अस्तित्वही ठेवायचे…तसा हा सारा कसोटीचा काळ. ९ सप्टेंबर रोजीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत व्यासपीठावर संचालकासोबत बसायचे की पुन्हा दूध उत्पादकांसोबत राहायचे, सभा मंडपात बसून सत्ताधाऱ्यांना आव्हान द्यायचे यावरुन असा पेच त्यांच्यासमोर होता. महायुतीचा अध्यक्ष म्हणून त्यांनी अध्यक्ष नविद मुश्रीफ यांना पूर्ण सहकार्याची ग्वाही दिली. महाडिक गटाकडून घोषणा, गोंधळ असा प्रकार होणार नसल्याची हमी दिली. अध्यक्ष मुश्रीफ यांनीही त्यांना व्यासपीठावर या म्हणत सन्मानाची जागा दिली. व्यासपीठाच्या मध्यभागी ज्येष्ठ संचालकांसोबत त्यांची खुर्ची ठेवली. मात्र महाडिक यांनी, वार्षिक सभेत व्यासपीठावर न जाता सभासदासोबत मंडपात थांबल्या. गोकुळचे माजी संचालक विश्वास जाधव, दीपक पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संग्रामसिंह कुपेकर, प्रताप पाटील कावणेकर, हंबीरराव पाटील हळदीकर, रविश पाटील हे सोबत होते.
अध्यक्षांच्या भाषणाप्रसंगी महाडिक गटांने कसल्याही घोषणा दिल्या नाहीत. कार्यकारी संचालक विषयपत्रिकेवरील पोटनियम दुरुस्ती मंजुरी व संचालकांची संख्या २१ वरुन २५ करण्याच्या विषय उपस्थित करताच त्यांनी, पोटनियम दुरुस्तीला विरोध केला. संचालक वाढीला विरोध नोंदविला. एव्हाना मुश्रीफ गटाकडून घोषणा सुरू झाल्या होत्या. तेव्हा महाडिक गटाकडून घोषणा सुरू झाल्या. व्यासपीठावर कार्यकारी संचालक प्रश्नोत्तरांचे वाचन करत होते. याप्रसंगी महाडिकांनी मिटिंग खर्च, अभ्यास दौऱ्यावरील खर्चाचे प्रश्न उपस्थित केले. सभासदांना प्रश्न विचारण्याची संधी द्या असे आवाहन करत होते. दरम्यान घोषणा, प्रश्नोत्तरांचे वाचन यामुळे कोण काय बोलत आहे हे कळत नव्हते. या साऱ्या गोंधळातच प्रश्नोत्तरांचे वाचन झाल्यानंतर सभा संपली. पोटदुरुस्ती नियम मंजूर झाली. त्यावर महाडिकांनी, ‘सत्ताधाऱ्यांनी पोटनियम दुरुस्ती मंजुरीचा विषय रेटला, मात्र एवढयावर प्रक्रिया थांबत नाही. पुढे बघू’असा सूचक इशारा देत संघर्षाचा पवित्रा कायम ठेवला.