पहिल्यांदाच अध्यक्ष, पहिलीच सभा नविद मुश्रीफांनी दाखविली नेतृत्वाची चुणूक अन् राजकीय चातुर्यही ! अवघड प्रश्नावर वळणदार उत्तरे !!
schedule10 Sep 25 person by visibility 240 categoryउद्योग

आप्पासाहेब माळी, महाराष्ट्र न्यूज वन : गोकुळ दूध संघाची वार्षिक सभा म्हणजे सत्ताधारी आणि विरोधकांत घोषणा युद्ध, हमरीतुमरी आणि कुरघोडीचे राजकारण. गेल्या चार वार्षिक सभेत तर सत्ताधारी आणि विरोधक सभेच्या प्रारंभापासून शेवटपर्यंत आमनेसामने उभे ठाकलेले. यंदा, गोकुळमध्ये महायुतीचा अध्यक्ष झाल्यामुळे परिस्थिती काही अंशी नियंत्रणात. मात्र समोर,अनेक प्रश्नांची आव्हाने. वासाच्या दुधाचा विषय. संचालिका शौमिका महाडिकांनी उपस्थित केलेले प्रश्न. शिवसेना ठाकरे गटाने जाजम व घडयाळ खरेदीवरुन केलेले आरोप आणि अध्यक्ष म्हणून कामकाज करत असताना गोकुळमध्ये महाविकास आघाडी व महायुतीच्या नेत्यांना करावी लागणारी कसरत…यामुळे अध्यक्ष नविद मुश्रीफ यांच्यासाठी वार्षिक सभा म्हणजे एक प्रकारची कसोटी होती. सत्तेचे कवच सोबत असले तरी, नेतृत्वगुणाची पारख होणार होती. मात्र मुश्रीफ यांनी अतिशय संयमाने, चातुर्याने सभा हाताळत नेतृत्वगुणांची चुणूक दाखविली. अवघड प्रश्नांवर वळणदार उत्तरे देत राजकीय चातुर्यही दाखविले. २०२१ पासून गोकुळने म्हैस दुधाला तेरा रुपये व गाय दूध खरेदी दराला सात रुपये दरवाढ केल्याचे ठासून सांगत हे श्रेय गोकुळमधील सत्ताधारी आघाडीच्या नेत्यांचे असल्याचे नकळतपणे दाखवून दिले.
गोकुळमध्ये ते पहिल्यांदाच संचालक म्हणून प्रतिनिधीत्व करत आहेत. गोकुळमध्ये पाच वर्षापूर्वी सत्ता परिवर्तन झाल्यानंतर पहिल्यांदा दोन वर्षे विश्वास पाटील, नंतर दोन वर्षे अरुण डोंगळे चेअरमन झाले. निवडणुकीच्या टप्प्यावरील वर्षात हे पद काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्या गटाला मिळणार होते. संचालक शशिकांत पाटील-चुयेकर यांचे नाव निश्चित झाले. दरम्यान कुरघोडीच्या राजकारणात गोकुळमध्ये महायुतीचा अध्यक्ष झाला पाहिजे अशा खेळी झाल्या. महाविकास आघाडी अर्थात काँग्रेसला पद मिळणार नाही या पद्धतीने व्यूहरचना आखली. मुंबईपर्यंत घडामोडी घडल्या. या साऱ्या प्रक्रियेदरम्यान नविद मुश्रीफ हे परदेश दौऱ्यावर होते.
राज्यात सत्ता महायुतीची. गोकुळमध्ये महायुतीचा अध्यक्ष करायचे ठरविले. गोकुळमध्ये आघाडीची सत्ता. या आघाडीत काँग्रेसचे वर्चस्व. यामुळे महाविकास आघाडीला आपला वाटणारा चेहरा म्हणून अखेर नविद मुश्रीफ यांचे नाव निश्चित झाले. परदेश दौऱ्यावरुन त्यांना परत बोलाविण्या आले. मुश्रीफ हे महायुतीचे अध्यक्ष झाले. मात्र कारभार हा आघाडीच्या नेत्यांच्या हातीच आहे. गोकुळचा अध्यक्ष कोणाचा ? हा प्रश्न चर्चेचा ठरला. त्यावर निवडीनंतर मुश्रीफ यांनी, ‘हम सब एक है’असे सांगितले. पुढे –पुढे विरोधी आघाडीकडून व महायुतीच्या अन्य मित्रपक्षाकडून गोकुळमध्ये अध्यक्ष महायुतीचा आणि कारभार आघाडीच्या नेत्यांच्या हाती अशी टीका करु लागले. नविद मुश्रीफ यांच्या पाठीमागे सत्तेचे कवच. मंत्री मुश्रीफ यांचा जिल्हयात राजकीय दबदबा. यामुळे नविद यांना कामकाजात काही अडचणी निर्माण झाल्या नाहीत. मात्र त्यांच्यासमोर आव्हान होते, ते वार्षिक सभा सुरळीत पार पाडायचे. महायुती व महाविकास आघाडीच्या नेत्यांना सांभाळायचे. चार वर्षे वार्षिक सभा गाजविणाऱ्या शौमिका महाडिक यांनी गोकुळच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित केले होते. त्यांना अध्यक्ष मुश्रीफ यांनी, ‘आपण सारे महायुतीत काम करत आहोत, संचालकांसोबत तुम्हीही व्यासपीठावर या ’असे म्हणत वातावरण बिघडणार नाही याची दक्षता घेतली. सभेपूर्वी महाडिक यांनी, संचालक मिटिंग खर्च, अभ्यास दौरा खर्चावर प्रश्न केले. गोकुळमध्ये महायुतीची सत्ता आहे म्हणता, अहवालात एकाही भाजप खासदार व आमदारांचा फोटो का नाही ? असा सवाल करत कोंडीत पकडले.
या अवघड प्रश्नावर सभेत मुश्रीफ यांनी वळणदार उत्तर दिले. वार्षिक अहवाल माझ्या काळातील नाही, त्यामुळे फोटो राहिले असतील असे सांगितले. तसेच महाडिक यांनी उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांना उत्तरे दिली आहेत. त्या आमच्या ताई आहेत, त्यांच्या ज्या प्रश्नांचे समाधान झाले नाही त्याचे आम्ही संचालक मंडळाच्या बैठकीत निरसन करू.असे उत्तर देत विरोधाची तीव्रता कमी करण्याचा प्रयत्न केला. नविद मुश्रीफ यांनी, वार्षिक सभेत पाऊणतासाहून अधिक वेळ भाषण करत गोकुळची कामगिरी सभासदांसमोर मांडली. वासाच्या दुधाच्या खरेदीदरात दुप्पटीने वाढ करत सभासदांना विश्वास दिला. पोटनियम दुरुस्तीचा विषय मंजूर करत आघाडीच्या नेत्यांना जे आवश्यक होते ते करुन दाखविले. शौमिका महाडिक काही गोष्टीवर आक्षेप नोंदवित होते. त्यावर तुमचा विरोध नोंदवून घेतला आहे सगळया प्रश्नांची उत्तरे देऊ असे सांगत वेळ मारुन नेली . प्रश्नोत्तरे दरम्यान मुश्रीफ समर्थकांच्या घोषणा वाढल्या. तेव्हा त्यांना दरडावणीच्या सुरात नव्हे तर अधूनमधून शांत राहण्याचे आवाहन करत सभा दोन तास चालविली.