सोळा सप्टेंबरला महासैनिक दरबार हॉलमध्ये झिम्मा-फुगडी स्पर्धा
schedule10 Sep 25 person by visibility 43 categoryराजकीय

महारगष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : धनंजय महाडिक युवाशक्ती महिला आघाडी प्रेरित भागीरथी महिला संस्था, भागीरथी युवती मंच, भागीरथी नागरी सहकारी पतसंस्था आणि भाजपच्यावतीने दरवर्षी पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठया झिम्मा फुगडी स्पर्धेचे आयोजन केले जाते. १६ सप्टेंबर २०२५ रोजी, महासैनिक दरबार हॉल येथे झिम्मा - फुगडीसह महिलांच्या पारंपारिक खेळांच्या स्पर्धा रंगणार आहेत. या स्पर्धेसाठी तब्बल ५ लाख रुपयांची आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.अशी माहिती भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक यांनी दिली. यावर्षी स्पर्धेचे फॉर्म भरण्याची सोय तालुकानिहाय प्रतिनिधींकडे आणि भागीरथीच्या ताराराणी चौकातील कार्यालयामध्ये उपलब्ध आहे. शुक्रवार १२ सप्टेंबर २०२५ ही फॉर्म भरून देण्याची अंतिम तारीख आहे. स्पर्धेसाठी सुमारे ४० परीक्षक, १५ निवेदिका आणि ६० स्वयंसेविकांची टीम सज्ज आहे. या स्पर्धेचा आनंद घरबसल्या लुटता यावा, यासाठी चॅनल बी च्यावतीने संपूर्ण स्पर्धेचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. तसेच स्पर्धेमध्ये सहभागी महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध टिव्ही मालिकांमधील लोकप्रिय कलाकारांसह काही चित्रपट कलाकार या स्पर्धेत उपस्थिती लावणार आहेत.स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी ०२३१- २६२५५७७ किंवा ९०७५२१७७८८ या क्रमांकाशी संपर्क साधावा, असे आवाहन महाडिक यांनी केले.