रद्द करा - रद्द करा, काळा कायदा रद्द करा ! जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात कोल्हापुरात निदर्शने !!
schedule10 Sep 25 person by visibility 33 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : जनतेवर लादण्यात आलेला जनसुरक्षा कायदा मागे घेण्याच्या मागणीसाठी इंडिया आघाडीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी, " रद्द करा- रद्द करा, काळा कायदा रद्द करा" अशा घोषणा दिल्या. विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चात, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. जोपर्यंत हा कायदा मागे घेतला जात नाही तोपर्यंत रस्त्यावरचा संघर्ष सुरूच राहण्याचा इशाराही यावेळी आमदार सतेज पाटील यांनी दिला.
आंदोलनकर्त्या जनतेची मुस्कटदाबी करणारे आणि घटनात्मक मुलभूत अधिकारांना विरोध करणारे, लोकशाही विरोधी जनसुरक्षा कायदा तात्काळ मागे घ्या. यासाठी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. आमदार पाटील यांच्यासह विविध पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या मारत जोरदार घोषणाबाजी करत जन सुरक्षा कायदा मागे घेण्याची मागणी केली. यावेळी बोलताना आमदार पाटील यांनी, राज्य सरकारने बहुमताचा वापर करत हा कायदा जनतेवर लादला आहे. इतर अनेक कायदे सक्षम असताना, जन सुरक्षा कायदा सरकारला हा हवा आहे. असा सवाल उपस्थित करत जनसुरक्षा कायदा जो पर्यंत मागे घेतला जात नाही तो पर्यंत संघर्ष सुरूच राहणार असल्याचा इशाराही दिला.
यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही बी पाटील, माजी महापौर आर के पोवार शिवसेना ठाकरे पक्षाचे उपनेते संजय पवार, सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, बाळासाहेब सरनाईक, सरला पाटील, आनंद माने, कॉम्रेड उदय नारकर, अतुल दिघे, चंद्रकांत यादव, बाबुराव कदम , संभाजीराव जगदाळे,सतीश कांबळे, रघुनाथ कांबळे , संपत देसाई, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाबासाहेब देवकर, माजी नगरसेवक सचिन चव्हाण , राजेश लाटकर, भारती पोवार, प्रतिज्ञा उत्तुरे, स्मिता मांडरे , सुभाष देसाई , शिक्षक नेते भरत रसाळे सहभागी होते.