प्राथमिक शिक्षक बँकेच्या अध्यक्षपदी शिवाजी रोडे-पाटील, उपाध्यक्षपदी सुरेश कोळी ! सत्ताधाऱ्यांचा पद वाटपाचा फॉर्म्युला ठरतोय चर्चेचा !!
schedule04 Aug 25 person by visibility 62 categoryशैक्षणिकसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : येथील दि प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी शिवाजीराव रोडे-पाटील, उपाध्यक्षपदी सुरेश कोळी यांची निवड झाली. सहायक निबंधक प्रेरणा शिवदास यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची (४ ऑगस्ट २०२५) बैठक झाली. यामध्ये पदाधिकारी निवडी करण्यात आल्या. बँकेचे मावळते अध्यक्ष सुरेश कोळी व उपाध्यक्ष पद्मजा मेढे यांनी पदाचा राजीनामा दिला होता. यामुळे रिक्त झालेल्या अध्यक्ष व उपाध्यक्षपद निवडीसाठी संचालक मंडळाची बैठक बोलाविण्यात आली होती. नूतन अध्यक्ष पाटील हे शाहूवाडी तालुक्यातील आहेत. ते शिक्षक संघ थोरात गटाकडून निवडून आले आहेत. तर उपाध्यक्ष कोळी हे करवीर तालुक्यातील आहेत. कोळी हे शिक्षक समितीचे आहेत.
संचालक मंडळाच्या बैठकीत अध्यक्षपदासाठी शिवाजीराव रोडे-पाटील यांचे नाव संचालिका वर्षा केनवडे यांनी सुचविले. संचालक अर्जुन पाटील यांनी अनुमोदन दिले. उपाध्यक्षपदासाठी कोळी यांचे नाव संचालिका पद्मजा मेढे यांनी सुचविले. संचालक बाळकृष्ण हळदकर यांनी अनुमोदन दिले. दोन्ही निवडी बिनविरोध झाल्या. अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर बोलताना रोडे-पाटील म्हणाले, ‘बँकच्या प्रगतीसाठी व सभासदांच्या उन्नतीसाठी मी प्रयत्न करीन. अध्यक्षपदाच्या कालावधीमध्ये बँकेचा कारभार पारदर्शी होण्यासाठी आणि बँकेचा व्यवसाय व ठेवींमध्ये वाढ होण्यासाठी प्राधान्य राहील. वचननाम्याच्या पूर्ततेसाठी सकारात्मक उर्जा घेऊन सभासदांच्या आर्थिक उन्नतीचा विचार घेऊनच संचालक मंडळ काम करील. सभासदांच्या अडचणी समजावून घेवून त्या सोडविण्यासाठी आपला प्रयत्न राहील.’
याप्रसंगी संचालक बाळासाहेब निंबाळकर, राजेंद्रकुमार पाटील, सुनिल एडके, एस.व्ही. पाटील, नंदकुमार वाईगडे, अमर वरुटे, शिवाजी बोलके, गजानन कांबळे, बाबू परीट, रामदास झेंडे, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयकुमार मगदूम उपस्थित होते. बँकेच्या नूतन अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी सुकाणू समितीचे जोतीराम पाटील, रविकुमार पाटील, सुनिल पाटील, विलास चौगुले, प्रमोद तौंदकर, रघुनाथ खोत, सदाभाऊ कांबळे, हेमंत भालेकर, तौसीफ पटेल, शिवाजी के. पाटील, बी.एस. पोवार, प्रकाश खोत, संजय कुर्दूकर उपस्थित होते.
………………..
सत्ताधाऱ्यांचा फॉर्म्युला, अध्यक्ष बनले उपाध्यक्ष
जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांची मुख्य बँक म्हणून प्राथमिक शिक्षक बँकेची ओळख आहे. बँकेमध्ये राजर्षी शाहू स्वाभिमानी शिक्षक आघाडीची सत्ता आहे. अधिकाधिक संचालकांना चेअरमनपदी संधी मिळावी यासाठी सत्ताधारी आघाडीने कधी दहा महिने, कधी सहा महिने तर कधी साडे तीन महिन्याचे चेअरमन निवड केली जात आहे. सुरेश कोळी हे गेली साडेतीन महिने बँकेचे अध्यक्ष होते. एप्रिल २०२५ मध्ये त्यांची बँकेच्या अध्यक्षपदी निवड झाली होती. सोमवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत त्यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. पहिल्यांदा अध्यक्ष आणि लगेच उपाध्यक्ष हा सारा फॉर्म्युला शिक्षक –सभासदांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. चेअरमनपदासाठी अनेकजण इच्छुक आहेत. मात्र व्हाइस चेअरमनपदासाठी फारसे कुणी उत्सुक दिसत नाही. गेल्या तीन वर्षाच्या कालावधीत अर्जुन पाटील, सुनील एडके, बाळासाहेब निंबाळकर, राजेंद्र पाटील, बाळकृष्ण हळदकर, सुरेश कोळी हे अध्यक्ष झाले. शिवाजीराव रोडे पाटील हे सातवे चेअरमन आहेत. तर उपाध्यक्षपदी पद्मजा मेढे, रामदास झेंडे यांना दोनदा संधी मिळाली. अमर वरुटे एकदा उपाध्यक्ष झाले. आता सुरेश कोळी पुन्हा उपाध्यक्ष झाल्याने त्यांच्याकडे दोनदा ही जबाबदारी झाली.