शिवसेना ठाकरे पक्षातर्फे महापालिकेला घेराओ, भ्रष्ट अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा
schedule04 Aug 25 person by visibility 15 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेतील भ्रष्टाचाराचा जाब विचारण्यासाठी शिवसेना ठाकरे पक्षातर्फे सोमवारी (४ ऑगस्ट) महापालिकेला घेराओ घालण्यात आला. भ्रष्ट अधिकारी व लोकप्रतिनिधींची नावे जाहीर करा अशी मागणी केली. महापालिकेतील भ्रष्ट अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावीत तसेच या साऱ्या प्रकाराची जबाबदारी घेऊन महापालिका प्रशासक व लोकप्रतिनिधींनी पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली. अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांनी निवेदन स्विकारले.
महापालिकेतील विविध विकासकामातील भ्रष्टाचार आण टक्केवारीच्या विरोधात महापालिकेवर दुचाकी व रिक्षाचा घेराओ घालण्यात आला. गांधी मैदान ते महापालिका अशी रॅली निघाली. ‘भ्रष्ट अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा, प्राथमिक शिक्षण मंडळातील अनागोंदी कारभार थांबवावा, जयप्रभा स्टुडिओची जागा परत करावी, भ्रष्ट अधिकाऱ्यांची नावे जाहीर करा.’या मजकुराचे फलक रॅलीत होते. या रॅलीत जवळपास ५०० दुचाकी आणि ३०० रिक्षा होत्या. महापालिकेसमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी ‘कोल्हापूर महापालिका ही सर्वात भ्रष्ट महापालिका बनली आहे. प्रशासनाने, भ्रष्टाचारी अधिकारी व लोकप्रतिनिधींची नावे जाहीर करावीत. या साऱ्या प्रकरणाची जबाबदारी स्विकारुन पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली. जिल्हाप्रमुख इंगवले, माजी नगरसेवक सुनील मोदी, प्रतिज्ञा उत्तुरे, रवी चौगले, महेश उत्तुरे, विशाल देवकुळे, राजू यादव, रिमा देशपांडे, दीपा शिंदे यांच्यासह कार्यकर्ते व नागरिक मोठया संख्येने रॅलीत सहभागी होते.