मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला, केशवराव भोसले नाट्यगृहासाठी पंचवीस कोटी मंजूर !
schedule30 Sep 24 person by visibility 363 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुर्नबांधणीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी दिलेला शब्द पाळला. कोल्हापूरवासीय, कलाकार, कलाप्रेमीतर्फे मुख्यमंत्री शिंदे यांचे जाहीर आभार मानतो असे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी म्हटले आहे.
नाट्यगृह आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी घटनास्थळी भेट देवून कलाकारांना दिलासा दिला होता.तसेच नाट्यगृह पुढील काळात दिमाखात उभे करण्याची ग्वाही दिली होती. त्यानुसार मुख्यमंत्री शिंदे यांच्या आदेशाने नगरविकास विभागाकडून "महानगरपालिका क्षेत्रात मुलभूत सोई सुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद" या योजनेअंतर्गत कोल्हापूर महानगरपालिका जि. कोल्हापूर करिता "कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रातील संगीतसुर्य केशवराव भोसले नाट्यगृह व राजर्षी शाहू खासबाग मैदानाचे नुतनीकरण, जतन, संवर्धन व पुर्नबांधणी करणे." या कामांकरिता २५ कोटी दहा लाख निधी मंजूर केल्याचे क्षीरसागर यांनी कळविले आहे.
नाट्यगृहाबाबतीत कोल्हापूरवासीयांच्या जोडलेल्या भावनांचा सहानुभूतीने विचार करून मुख्यमंत्री शिंदे यांनी कोल्हापुरवासीय, कलाकार, कलाप्रेमींना दिलेला शब्द पाळला आहे. मंजूर निधीतून लवकरच कामास सुरवात होणार असून, कोल्हापूरची अस्मिता पुन्हा त्याच दिमाखात उभी राहिल्याचे दिसून येईल. मंजूर केलेल्या निधीबद्दल मुख्यमंत्री शिंदे यांच्या सह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेही जाहीर आभार मानत असल्याचे क्षीरसागर यांनी म्हटले आहे.