हद्दवाढीचा फायदा ग्रामीण भागालाही, जिल्हयाचा विकास होणार – राजेश क्षीरसागर
schedule23 Mar 25 person by visibility 198 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘टोल विरोधी आंदोलनात ज्या पद्धतीने ग्रामीण आणि शहरी नागरिकांनी एकजूट दाखवून टोल हटविला, त्याच पद्धतीने हद्दवाढीच्या विषयावर ग्रामीण आणि शहरवासियांनी एकत्र येत समर्थन व विरोधाचा सुवर्णमध्ये काढावा. हद्दवाढीचा फायदा ग्रामीण भागालाही होणार आहे. संपूर्ण कोल्हापूर जिल्हयाच्या विकासाला हद्दवाढीमुळे चालना मिळेल.’ असे आवाहन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष व आमदार राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केला.
येथील शिवाजी चौक येथे रविवारी, २३ मार्च रोजी हद्दवाढ समर्थनासाठी कोल्हापुरात सर्वपक्षीय धरणे आंदोलन करण्यात आले.या आंदोलनस्थळी भेट देऊन आमदार क्षीरसागर यांनी भूमिका व्यक्त केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये सोमवारी, (२४ मार्च) विधानभवनात बैठक होत आहे. त्या अनुषंगाने आमदार क्षीरसागर म्हणाले, ’उपमुख्यमंत्री, लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये सोमवारी होणारी बैठक ही हद्दवाढीसाठीचे पहिले पाऊल ठरणार आहे. महापालिकेची एकदाही हद्दवाढ झाली नाही. हद्दवाढीअभावी शहर व जिल्हयाची प्रगती खुंटली आहे. कोल्हापूरच्या विकासासाठी हद्दवाढ गरजेची आहे. २०१४ मध्ये हद्दवाढीचा निर्णय झाला होता, मात्र अंतिम क्षणी काहींनी विरोध केला.
हद्दवाढीसंबंधी ग्रामीण भागात जे गैरसमज आहेत, ते दूरू करुन विकासाच्या प्रक्रियेत त्यांना सामावून घेऊ. हद्दवाढ झाली तर ग्रामीण भागाचा कायापालट होणार आहे. कोणाचीही जमीन हिसकावून घेतली जाणार नाही. आरक्षण पडणार नाही.उलट नागरिकांच्या जमीनीला किंमत येणार आहे. विकासाचे नवे प्रकल्प सुरू होतील. ’असे आमदार क्षीरसागर यांनी नमूद केले.
हद्दवाढ कृती समितीचे निमंत्रक आर. के. पोवार यांनीही शहराच्या विकासासाठी हद्दवाढ गरजेची असल्याचे नमूद केले. हद्दवाढीला विलंब झाला तर पुकारण्यात आलेल्या आमरण उपोषणामध्ये बाबा इंदूलकर, दिलीप देसाई यांच्यासोबत मी ही सहभागी होणार आहे असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान दसरा चौकात झालेल्या धरणे आंदोलनात शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष सुजित चव्हाण, भाजपाचे महेश जाधव, महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव, माजी नगरसेवक बाबा पार्टे, अशोक भंडारे, अनिल कदम, राजसिंह शेळके, पद्मा तिवले, शिवाजी जाधव, किशोर घाटगे, सुनील देसाई, शशिकांत बीडकर, आपचे संदीप देसाई, उत्तम पाटील, सुभाष देसाई, गणेश जाधव, कमलाकर जगदाळे, विजय अग्रवाल, शाहीर दिलीप सावंत, फिरोज सरगुर, भाजपाच्या गायत्री राऊत, वैशाली महाडिक आदींचा सहभाग होता.