महापालिका निवडणुकीसाठी 11 नोव्हेंबरला आरक्षण सोडत
schedule27 Oct 25 person by visibility 500 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : आगामी महापालिका निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार 11 नोव्हेंबर 2025 रोजी महापालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश कांकाणी यांनी यासंदर्भातील आदेश काढला आहे. 11 नोव्हेंबर रोजी आरक्षण सोडत काढून त्याच दिवशी त्यासंदर्भातील अहवाल राज्य निवडणूक आयोगाकडे मान्यतेसाठी सादर करण्याच्या सूचना आहेत. राज्य निवडणूक आयोगाने यासंदर्भातील कार्यक्रम स्पष्ट करताना म्हटले आहे की 30 ऑक्टोबर ते चार नोव्हेंबर 2025 या कालावधीत आरक्षण जागांची संख्या निश्चित करून त्याला राज्य निवडणूक आयोगाची मान्यता घ्यायचे आहे तर आठ नोव्हेंबर 2025 रोजी आरक्षण सोडत तारखेची सूचना प्रसिद्ध करायची आहे. 11 नोव्हेंबर रोजी आरक्षण सोडत प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. तर आरक्षणावर हरकती व सूचना मागवण्याचा कालावधी 24 नोव्हेंबर 2025 पर्यंत आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेनंतर अंतिम आरक्षण सरकारच्या राजपत्रात दोन डिसेंबर 2025 रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. कोल्हापूर महापालिका निवडणूक वीस प्रभागातील 81 नगरसेवकांच्या निवडीसाठी होणार आहे.