माजी नगरसेवक रमेश पोवार लवकरच शिवसेनेत ! आबिटकर, क्षीरसागरांच्या उपस्थितीत होणार प्रवेश
schedule26 Oct 25 person by visibility 236 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच पक्षाकडून सक्षम उमेदवारांचा शोध सुरू झाला आहे. प्रभागात संपर्क, निवडून येण्याची क्षमता या बाबी विचारात घेऊन ताकतवान उमेदवारांचे इनकमिंग सुरू आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक व स्थायी समितीचे माजी सभापती रमेश पोवार यांचा लवकरच शिवसेनेत प्रवेश होणार असल्याचे वृत्त आहे. पालकमंत्री प्रकाश आबिटकर व कोल्हापूर उत्तरचे आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासोबत त्यांची चर्चा झाली आहे. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे. मंत्री आबिटकर व आमदार क्षीरसागर यांच्या उपस्थितीमध्ये पाच किंवा सहा नोव्हेंबर 2025 रोजी त्यांचा पक्षप्रवेश होऊ शकतो. त्यावेळी आणखी काही मंडळी प्रवेश करणार असल्याचे वृत्त आहे. पोवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून निवडून आले होते. महापालिकेत स्थायी समिती सभापतीपदी त्यांनी काम केले आहे. लोक संपर्क असलेला नगरसेवक म्हणून त्यांना ओळखले जाते. राष्ट्रवादी शरद पोवार पक्षाचे शहराध्यक्ष आर के पोवार यांचे ते पुतणे आहेत. रमेश पोवार यांनी शिवसेनेत प्रवेश करण्यासंदर्भात पालकमंत्री आबिटकर व आमदार क्षीरसागर यांच्या सोबतही चर्चा झाली आहे. मंत्री आबिटकर यांनी सोमवारी दिवाळी सणाचे औचित्य साधून यापूर्वी शिवसेनेतील प्रवेश केलेल्या काही माजी नगरसेवकांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. स्थायी समितीचे माजी सभापती शारंगधर देशमुख यांच्या साने गुरुजी वसाहत येथील निवासस्थानी झालेल्या या सदिच्छा भेटी वेळी माजी नगरसेवक पोवार हे देखील उपस्थित होते. यावरून पोवार यांचा शिवसेनेत प्रवेश निश्चित मानला जात आहे. मंत्री आबिटकर यांनी देशमुख यांच्या निवासस्थानी दिलेल्या सदिच्छा भेटीप्रसंगी माजी नगरसेवक प्रकाश नाईकनवरे, आनंदराव खेडकर, अभिजीत चव्हाण, रशीद बारगीर, अभिजीत खतकर, सुशांत पोवार,इस्माईल बागवान, विक्रम कांबळे, उदय सासणे. अश्फाक आजरेकर आदी उपस्थित होते