नगरसेवकांच्या पुढाकारातून रंगपंचमी ! सानेगुरुजीत शारंग महोत्सव, दुधाळीत रंगोत्सव !!
schedule18 Mar 25 person by visibility 215 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : रंगपंचमी, रंगोत्सव हा साऱ्यांचा आवडीचा. लहानथोर सगळेच रंगाच्या या उत्सवात न्हाऊन निघतात. आनंद लुटतात. लोकांचा उत्साह पाहून माजी नगरसेवकांच्या पुढाकारातून रंगोत्सवचे आयोजन केले जाते. यंदाही ठिकठिकाणी असे महोत्सव होत आहेत.
स्थायी समितीचे माजी सभापती शारंगधर देशमुख यांच्या पुढाकारातून सानेगुरुजी परिसरात गेली सात वर्षे रंगपंचमीदिनी, ‘शारंग महोत्सव’होत आहे. यंदा हा महोत्सव बुधवारी (१९ मार्च २०२५) होत असून एकजुटी तरुण मंडळ, मोहिते पार्क, राधानगरी रोड येथे होत आहे. हा महोत्सव फक्त महिलासाठी आहे. मोफत प्रवेश आहे. सकाळी नऊ वाजता सुरुवात होणार आहे. या ठिकाणी रंगपंचमी साजरी करण्यासह स्पॉट गेम्स, डीजे धम्माल असणार आहे. या कार्यक्रमात इन्फ्लुएंसर पिया नाझरे, रायडर गायत्री पटेल यांचा सहभाग असणार आहे. वर्षा जोशी या सूत्रसंचालन करणार आहेत. कार्यक्रमात महिलांसाठी स्पोर्ट्स गेम, आकर्षक स्पर्धांचे आयोजन केले आहे. एकजुटी तरुण मंडळ यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले आहे. महिलांनी या महोत्सवाचा आनंद लुटावा, मोठया संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन प्रमिला शारंगधर देशमुख यांनी केले आहे.
प्रतापसिंह जाधवांच्या पुढाकारातून दुधाळी रंगोत्सव
माजी नगरसेवक प्रतापसिंह जाधव यांच्या पुढाकारातून ‘दुधाळी रंगोत्सव २०२५’चे आयोजन १९ मार्च रोजी केले आहे. दुधाळी मैदान येथे सकाळी नऊ ते दुपारी चार या वेळेत हा रंगोत्सव होत आहे. मोफत प्रवेश आहे. श्री साई सर्कल मित्र मंडळ, सरकार प्रेमीतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. ग्रुप डान्स मुंबईचा कार्यक्रम आहे. शिवाय स्पॉट गेम्स आहेत. शॉवर डान्सचा आनंद लुटता येणार आहे. दुधाळी रंगोत्सवात नागरिकांनी, महिला भगिनींनी मोठया संख्येने सहभागी होऊन या कार्यक्रमाचा आनंद लुटावा असे आवाहन माजी नगरसेवक जाधव यांनी केले आहे.