महायुतीच्या उमेदवारांचे शक्तीप्रदर्शन, मतदारांचा ओसांडणारा उत्साह ! मंत्री - आमदारांसह कार्यकर्त्यांनी धरलेला फेर ! !
schedule30 Dec 25 person by visibility 91 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : मतदारांचा ओसांडणारा उत्साह, महायुतीच्या विजयाच्या घोषणा, हवेत फडफडणारे भगवे झेंडे, हलगीचा कडकडाटावर कार्यकर्त्यांचा जल्लोष आणि पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार राजेश क्षीरसागर यांनी हात उंचावत धरलेला फेर अशा उत्साही वातावरणात महायुतीच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. प्रभाग क्रमांक ७ ड मधून युवासेना पश्चिम महाराष्ट्र सचिव ऋतुराज क्षीरसागर, प्रभाग ७ क मधून शिवसेना महानगर अध्यक्षा सौ.मंगल साळोखे, प्रभाग ६ अ मधून शिला अशोक सोनुले, प्रभाग ६ ड मधून माजी नगरसेवक नंदकुमार मोरे यांनी निवडणूक कार्यालय दुधाळी येथे आपला उमेदवारी अर्ज आज दाखल केला. यावेळी शिवसेनेकडून प्रचंड शक्तीप्रदर्शन करण्यात आले.
शिवालय शिवसेना जिल्हा कार्यालय येथून रॅलीची सुरवात करण्यात आली. या रॅलीची महिलांची संख्या लक्षणीय होती. हाती भगवे झेंडे, डोक्यावर भगव्या रंगाच्या टोप्या, गळयात मफलर यामुळे सगळे वातावरण भगवेमय झाले होते. प्रभागातील विविध भागातून ही रॅली दुधाळी मैदान येथील निवडणूक कार्यालयात पोहोचली. या रॅलीमध्ये माजी महापौर महादेवराव आडगुळे, भाजपचे महेश जाधव, शिवसेना शहरप्रमुख रणजीत जाधव, युवा नेते पुष्कराज क्षीरसागर , माजी उपमहापौर दिगंबर फराकटे, उदय भोसले, किशोर घाटगे, विकी महाडिक, नेपोलियन सोनुले, इंद्रजीत आडगुळे, अनिल पाटील, अभिजित सांगावकर, अमेय भालकर, भरत काळे, बबन गवळी, युवासेना शहरप्रमुख विश्वदीप साळोखे, कपिल केसरकर, कपिल नाळे, अर्जुन आंबी, अभिजित गजगेश्वर, शैलेन्द्र गवळी, शैलेश साळोखे, विश्वदीप चव्हाण आदी सहभागी झाले.
ऋतुराज क्षीरसागर हे गेले अनेक वर्षे समाजसेवेचे काम करत आहेत. त्यांच्या लोकहिताच्या कार्यामुळे प्रभागात त्यांची चांगली प्रतिमा तयार झाली आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आलेल्या नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता त्यांच्या विजयाचा गुलाल उधळण्यासाठी पुन्हा येवू, असा विश्वास कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आबिटकर यांनी व्यक्त केला. याप्रसंगी ऋतुराज क्षीरसागर म्हणाले, ‘गेले १० वर्षे या प्रभागातील नागरिकांना मुलभूत सोयी सुविधा देण्यासाठी विकासात्मक काम केले आहे. जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. प्रभागाचा सर्वांगीण विकास हाच प्रचाराचा मुद्दा घेवून जनसंपर्क साधत असल्याचे सांगितले.
……………..
“युवासेनेच्या माध्यमातून ऋतुराज क्षीरसागर यांनी युवकांची मोट बांधली आहे. गेली अनेकवर्षे लोकांच्या प्रश्नांना जाणून घेवून तत्परतेने ते सोडविण्याचे प्रयत्न त्यांनी केले आहेत. आमदार पुत्र ही प्रतिमा पुसून जनतेसाठी झटणारा युवा कार्यकर्ता हीच प्रतिमा त्यांनी तयार केल्याने नागरिकांमधून त्यांना प्रचंड पाठींबा मिळत आहे. स्वकर्तृत्वावर ते पुढे आले असून, जनता त्यांच्या पाठीशी ठाम उभी राहील.”
- राजेश क्षीरसागर आमदार कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ