प्रॉपर्टी कार्डवर नोंदीसाठी लाच घेणाऱ्या दोघांना पोलिसांनी पकडले
schedule13 Aug 24 person by visibility 303 categoryगुन्हे
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : प्रॉपर्टी कार्डवर वारसा हक्क प्रमाणे नोंदी करण्यासाठी चार हजार रुपयाची लाच घेणाऱ्या दोघांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले. ही घटना हातकणंगले भूमी अभिलेख कार्यालयात जवळ घडली. परिरक्षण भूमापक तुषार महादेव सोनवणे (रा. बामनोली, मिरज, जि. सांगली, मुळगाव आटपाडी जि. सांगली) आणि पंटर अमर विक्रम चौगुले (रा. शिवाजी तालीम हातकणंगले) अशी लाच घेणाऱ्या दोघांची नावे आहेत. पोलिसांनी या कारवाईची माहिती दिली. तक्रारदाराने प्रॉपर्टी कार्डावर वारसा प्रमाणे नोंदी केल्या. तसेच अन्य एका मालमत्तेवर नोंदी करण्यासाठी तक्रारदार भूमी अभिलेखा कार्यालयात गेले असता पंटर अमर चौगुले याने प्रॉपर्टी कार्डवर नोंदी करण्यासाठी दहा हजार रुपयाची लाचेची मागणी केली. त्यानंतर तक्रारदारांने परिरक्षण भूमापक सोनवणे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनीही दहा हजार रुपये लाचेची मागणी केली. त्यानंतर तडजोडीअंती चार हजार रुपये लाचेची मागणी केली. त्यानंतर तक्रारदारांने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली असता त्यांच्या तक्रारीची खातरजमा करून पोलिसांनी सापळा रचला. तुषार सोनवणे आणि अमर चौगुले या दोघांना चार हजार रुपयांची लाच घेताना पोलिसांनी रंगेहात पकडले. लासलुजपत प्रतिबंधक कोल्हापुर विभागाचे पोलीस उप अधीक्षक बापू साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार प्रकाश भंडारे, हेड कॉन्स्टेबल विकास माने, सुनील घोसाळकर, सुधीर पाटील, गजानन कुराडे यांनी कारवाईत भाग घेतला.