लोकांच्या भावना इमारतीच्या कणाकणात ! नाट्यगृह पुन्हा दीड वर्षात दिमाखात उभं राहिल !! पालकमंत्री हसन मुश्रीफ
schedule14 Oct 24 person by visibility 168 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह आठ ऑगस्ट 2024 रोजी आगीच्या दुर्देवी घटनेत जळाले, हा दिवस अतिशय वाईट दिवस ठरला असे सांगून पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, नाट्यगृहाची इमारत जरी दगड, विटा, सिमेंट, लाकडाने उभी असली तरी त्यामध्ये लोकांच्या भावना इमारतीच्या कणाकणात रूजलेल्या आहेत. असे हे नाट्यगृह पुन्हा दीड वर्षात दिमाखात उभं राहील अशी ग्वाही मंत्री मुश्रीफ यांनी दिली. सोमवारी 14 ऑक्टोबरच्या सकाळी सात वाजता पालकमंत्री मुश्रीफ व खासदार छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीच्या कामाचे भूमिपूजन झाले. यावेळी आमदार जयश्री जाधव, जिल्हाधिकारी अमोल येडगे, महापालिका प्रशासक के. मंजुलक्ष्मी, अति.आयुक्त राहूल रोकडे, माजी नगरसेवक आदिल फरास, सिने अभिनेते आनंद काळे, व्ही बी पाटील, ठेकेदार वेणुगोपाल, श्रीनिवासन, चेतन रायकर उपस्थित होते. यावेळी भूमिपूजन झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या संदेशाचे वाचन करण्यात आले.
खासदार छत्रपती शाहू महाराज म्हणाले, सर्वांच्या भावना घेवून हे काम पुढे जाईल आणि दीड वर्षाच्या आत नाट्यगृहात पुन्हा कार्यक्रमांना सुरुवात होईल. पुनर्बांधणीसाठी स्थापन केलेल्या सुकाणु समितीने चांगली साथ दिल्याचे सांगून सर्वांनी लक्ष दिल्यानेच हे नाट्यगृह उभारणीचे काम गतीने सुरु झाले.
जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, कार्यकारी अध्यक्ष तसेच सर्व कोल्हापूरकर यांच्या सहकार्याने नाट्यगृह उभारणीचा पहिला टप्पा सुरु करतोय ही आनंदाची बाब असल्याचे सांगितले. हे काम लवकरात लवकर होईल अशी ग्वाही देवून पुढील कामेही वेळेतच होतील असे सांगितले. महानगरपालिका प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांनी प्रास्ताविकात आचारसंहितेत काम थांबायला नको म्हणून सर्व प्रक्रिया गतीने राबविली असल्याचे सांगून कोल्हापूरवासियांच्या भावना व मुख्यमंत्री व खासदार यांच्या पाठपुराव्याने तातडीने काम सुरु होत असल्याचे सांगितले. त्या म्हणाल्या, पालकमंत्री, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, तसेच इतर लोकप्रिनिधींनी प्रत्येक अडचणीत सहकार्य केले. अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांनी आभार मानले. विजय वनकुद्रे यांनी सूत्रसंचालन केले.