इचलकरंजी महापालिकेच्या आयुक्तपदी पल्लवी पाटील
schedule14 Feb 25 person by visibility 284 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी,कोल्हापूर : इचलकरंजी महापालिकेच्या आयुक्तपदी पल्लवी पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांची अन्यत्र बदली झाली आहे. इचलकरंजी महापालिकेचे आयुक्तपद गेले काही दिवस चर्चेत आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे महापालिकेच्या प्रशासकपदाचा कार्यभार सोपविला होता. तर दिवटे यांच्याकडे आयुक्तपद कायम होते. दिवटे यांनी राज्य सरकारकडे बदली मागितली होती.
दरम्यान इचलकरंजी महापालिका आयुक्तपदी पल्लवी पाटील यांची दुसऱ्यांदा नियुक्ती झाली. जून २०२४ मधील दुसऱ्या आठवडयात पाटील यांची इचलकरंजी महापालिका आयुक्तपदी नियुक्ती झाली होती. पाटील या सातारा जिल्हा प्रशासन अधिकारीपदी कार्यरत होत्या. जून २०२४ मध्ये त्यांनी इचलकरंजी येऊन आयुक्तपदाचा कार्यभार स्विकारला होता. दरम्यान दिवटे यांनी बदलीच्या निर्णयाला आव्हान दिले. मॅटकडे दाद मागितली होती. या साऱ्या प्रकरणातून त्यावेळी पाटील यांच्या आयुक्तपदावरील नियुक्तीला स्थगिती मिळाली होती आणि दिवटे यांच्याकडे पुन्हा आयुक्तपदाचा कार्यभार सोपविला होता. मात्र त्यावेळी आयुक्तपदाचा कार्यभार या दोन्ही अधिकाऱ्यांनी घेतल्याची स्थिती होती.
दरम्यान आठ दिवसापूर्वी जिल्हाधिकारी येडगे यांची इचलकरंजी महापालिकेचे प्रशासक म्हणून जादा कार्यभार देण्यात आला. आयुक्त दिवटे यांच्याकडे प्रशासकपदाचे अधिकार काढून घेतले होते. दिवटे यांची आयुक्त म्हणून पदभार होता. दिवटे यांनीही सरकारकडे बदलीची मागणी केली होती. त्यांची अन्यत्र बदली झाली असून इचलकरंजी महापालिका आयुक्तपदी पल्लवी पाटील नियुक्ती झाली. पाटील यांनी शुक्रवारी (१४ फेब्रुवारी २०२५) आयुक्तपदाचा कार्यभार स्विकारला. तर दिवटे यांची इचलकरंजी महापाालिका आयुक्तपदी सहा जुलै २०२३ रोजी नियुक्ती करण्यात आली होती. महापालिकेत आयुक्त म्हणून काम करताना तत्कालिन आमदार प्रकाश आवाडे व त्यांच्यामध्ये मतभेदही झाले होते. दिवटे यांनी प्रशासकीय कामकाजावर पकड ठेवताना महापालिकेला आर्थिक शिस्त लावण्याचाही प्रयत्न केला.